Live Cricket Score, LSG vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 26 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला.या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा सहा गडी राखून पराभव करून त्यांची विजयी मालिका थांबवली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 18.1 षटकांत चार गडी गमावून 170 धावा केल्या आणि या मोसमातील आपला दुसरा विजय संपादन केला.
विजयासाठी 168 धावांचा पाठलाग करताना शॉ आणि वॉर्नर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये तीन षटकांत 22 धावांची भागीदारी झाली होती. मात्र चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बोल्ड करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. वॉर्नर नऊ चेंडूत आठ धावा करून बाद झाला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला सलामीवीर पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांनी सांभाळले आणि पॉवरप्ले संपेपर्यंत संघाने एका विकेटवर 62 धावा केल्या होत्या. त्यानंतर सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फिरकीपटू रवी बिश्नोईने सलामीवीर पृथ्वी शॉला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. पृथ्वी 22 चेंडूत 32 धावा करून बाद झाला.
त्यानंतर ऋषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि दिल्ली कॅपिटल्सने 13 षटकात 121 धावसंख्येपर्यत मजल मारली. दरम्यान, जॅक फ्रेझर मॅकगर्कने लखनौविरुद्ध पदार्पणाच्याच सामन्यात दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेगच दिल्ली कॅपिटल्सला मोठा व तिसरा फटका बसला. अर्धशतकी खेळीनंतर फ्रेझर बाद झाला. नवीन उल हकने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फ्रेझर 35 चेंडूत 55 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
दिल्लीला 27 चेंडूत 22 धावांची गरज असताना 15.3 षटकात दिल्ली कॅपिटल्सची चौथी विकेट पडली. ऋषभ पंत 24 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. रवी बिश्नोईने पंतला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर दिल्लीला 3 षटकात फक्त 10 धावा हव्या होत्या. शाई होप आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी घाई न करता 11 चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा 6 गडी राखून विजय निश्चित केला.स्टब्सने नाबाद 15 धावा केल्या. शाई होपने नाबाद 11 धावा केल्या. यादरम्यान लखनौकडून रवी बिश्नोईने 2 बळी घेतले. नवीन आणि यशने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौ येथील एकना स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 च्या 26 व्या सामन्यात प्रथमतः गोलंदाजीत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी कुलदीप यादवसह(3-20) कमाल करताना लखनौ सुपर जायंट्सच्या सुरुवातीच्या फलंदाजी फळीची वाताहत केली. अखेर, नवोदित फलंदाज आयुष बडोणीने 35 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 55 धावांची झंझावाती खेळी करताना लखनौचा डाव सावरला. त्याच्या कामगिरीमुळे लखनौला निर्धारित षटकांत 7 बाद 167 धावसंख्येपर्यत मजल मारता आली.
Gotta defend 167. If you know you know 👀🤞 pic.twitter.com/3XpHqojJ9a
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 12, 2024
प्रथम फलंदाजी करताना लखनौला क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात करून दिली, पण तो 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनौचा कर्णधार के.एल. राहुलने जबाबदारी स्वीकारत 22 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, पण आयपीएल 2024 मध्ये त्याला दुसरे अर्धशतक झळकावता आले नाही. संघ सतत विकेट गमावत होता, त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनौच्या संघावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, निकोलस पूरन 0 धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा आणि कृणाल पांड्या यांनाही फलंदाजीची जादू दाखवता आली नाही. यादरम्यान लखनौसाठी आयुष बडोणी तारणहार ठरला, त्याने 55 धावा केल्या आणि संघाला 167 धावांपर्यंत नेले.
लखनौ संघाने 94 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या, परंतु आयुष बडोणी आणि अर्शद खान यांनी संघाची मान वाचवली. दोघांमध्ये 73 धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. एकीकडे बडोनीने 35 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली, तर अर्शदने 16 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. लखनौच्या फलंदाजांनी शेवटच्या 3 षटकात 39 धावा काढत संघाची धावसंख्या 167 पर्यंत नेली.
दिल्लीकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. खलील अहमदने 2 बळी घेतले. मुकेश कुमार आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.