IPL 2021 : कोलकाताविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा रोमांचक विजय

चेन्नई  –  सूर्यकुमार यादवचं शानदार अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक लढतीत १० धावांनी विजय मिळवला. 

पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटकांत सर्वबाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला  २० षटकांत ७ बाद १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरुवात चांगली झाली. नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी ७२ धावांची सलामी दिली. मात्र शुभमन ३३ धावा करून बाद झाल्यानंतर आलेले राहुल त्रिपाठी (५), इऑन मॉर्गन (७) आणि शकीब अल हसन (९) झटपट बाद झाले. तर नितीश राणा देखील अर्धशतक करून तंबूत परतला. त्याने ४७ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ५७ धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसलने ८ आणि दिनेश कार्तिकने ९ धावा केल्या. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं. 

मुंबईकडून राहुल चहरने चार आणि ट्रेन्ट बोल्टने दोन विकेट घेतल्या. तर कृणाल पांड्याने एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या मुंबई संघाने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. तर मुंबईच्या इतर खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करण्यात अपय़श आलं.

कोलकाताकडून रसेलने दोन षटकांत पाच बळी घेतले. तर पॅट कमिन्सने दोन आणि वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.