विशेष : आंबेडकरवाद – जगण्याचा समृद्ध ठेवा

ऍड. हृषीकेश काशिद

प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा जन्मसिद्ध हक्‍क आहे. त्याच्या निसर्गदत्त जगण्याच्या आड कोणी येत असेल तर आंबेडकरवाद त्याला प्रखर विरोध करतो. आज डॉ. बाबासाहेबांची जयंती त्यानिमित्त…

अण्णा भाऊ म्हणतात, “जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव’. ही भीमशक्‍ती अन्याय दूर करण्यासाठी चळवळ करते. आंबेडकरवादाने माणसाला माणूस म्हणून ओळख दिली. म्हणूनच हा मानवतावादी आहे. आंबेडकरवाद हा बुद्धिप्रामाण्यवादी व तर्कशुद्ध होय. याची आपण बुद्धिवादाच्या शास्त्रीय कसोटीवर चिकित्सा करू शकतो. बुद्धिवादातील विवेकाला आंबेडकरवाद प्रेरणा देतो.

आंबेडकरवाद हे मानवी जीवनाची पुनर्रचना करणारे शास्त्र आहे. मानवी जीवनाची पुनर्रचना यातच सम्यक विचारांची सूत्रे आहेत. “सम्यक’ म्हणजे योग्य. ज्या विचारांमध्ये स्पष्टता आहे असा संपूर्ण विचार. जीवनाची पुनर्रचना करताना तो विचार योग्य आहे की अयोग्य, याची पडताळणी करूनच जीवनाची पुनर्रचना करावी लागते.

जीवनाची नव्याने उभारणी करणे म्हणजेच आपल्या जीवनात आलेल्या तकलादू गोष्टी टाकून देणे होय. आंबेडकरवाद ठराविक जातीसाठी काम करत नाही. तो जात, धर्म, पंथ, वंश, लिंग व देश यांच्या मर्यादा तोडून माणसाची माणूस म्हणून ओळख करून देणारी एक विचारसरणी आहे. 

कोणत्याही पुरोगामी विचारसरणीची व्यक्‍ती बुद्धिवादाच्या विवेकावर आधारित विचार करणारी असेल आणि मानवमुक्‍तीची समर्थक असेल तर आपण तिला “आंबेडकरवादी’ म्हणू शकतो. केवळ एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून व मानवमुक्‍तीच्या शृंखला तोडण्यास एखाद्या जातीचा संदर्भ घेतला म्हणून जर आपण त्यांना मर्यादित करत असू तर तो आपलाच पराभव आहे. डॉ. बाबासाहेबांची भूमिका सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची होती.

राजकारण ही अनेक व्यक्‍तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास “राजकारण’ म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याकडे पाहात नाही. देशात सध्या द्वेष, सूड आणि नकारात्मकतेने भरलेले राजकारण आपल्यासोबत खेळले जात आहे. अशावेळी प्रेम आणि सद्‌भावना जोपासणारा, सगळ्यांना जोडणारा आपला भारत आपल्यापासून दूर जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते रोखण्यासाठी आंबेडकरवादच आत्मविश्‍वासपूर्ण मार्ग आहे.

ही मांडणी म्हणजे मानवमुक्‍तीची फेरमांडणी होय. या फेरमांडणीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या घटकांना विशेष महत्त्व दिले आहे. माणूस कोणाचा गुलाम राहणार नाही अथवा मालक असणार नाही. कोणतीही हुकूमशाही समाजात नसणार अशा आदर्श समाजाचे प्रारूप आपल्याला आंबेडकरवादात दिसते. 

“संसदीय लोकशाही ही भांडवलदारांच्या हुकूमशाहीचे दुसरे नाव आहे’ अशी संभावना डॉ. बाबासाहेब करतात. संसदीय लोकशाहीचे मॉडेल ठरविल्या जाणाऱ्या इंग्लंड व फ्रान्समध्ये देखील खरी लोकशाही व स्वातंत्र्य, समता व बंधुता नसून तेथेही भांडवलदारांच्या हातात राजसत्ता जाऊन ह्या तत्त्वांची घोषणा फोल ठरली असल्याचे मत बाबासाहेबांनी व्यक्‍त केले आहे. अर्थात, सध्याच्या भारतीय परिस्थितीत असेच काहीसे झाले आहे. म्हणून आंबेडकरवाद महत्त्वाचा ठरतो कारण त्यात कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात नाही. गरीब श्रीमंत सर्वांचा एकसारखाच सन्मान होतो.

आंबेडकरवाद विज्ञाननिष्ठ आहे. जीवनाला सत्य मानणारी प्रणाली म्हणजेच आंबेडकरवाद होय. याचा मूळ गाभा हा वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे. आंबेडकरवादाने पाप-पुण्य, कर्मकांड, अंधश्रद्धा, आत्मा, पुनर्जन्म या सर्वच गोष्टींना नकार दिला आहे. आंबेडकरवाद हे विचार स्वातंत्र्याला मानणारे तत्त्वज्ञान आहे. प्रत्येक माणसाला स्वतंत्र विचार करण्याची मुभा असावी, त्याने चिकित्सक बुद्धीने विचार करावा. कोणी काही सांगते म्हणून आंधळेपणाने विश्‍वास न ठेवता चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे, असे आंबेडकरवाद सांगतो.

मानवी जीवनाभोवतालची जी जातिधर्माची चौकट आहे ती आंबेडकरवादात निषिद्ध मानली आहे. माणूस हा माणूस आहे. माणसाने माणसांचे माणूसपण अबाधित ठेवावे. स्वतःचे माणूसपण फुलवित असताना दुसऱ्या माणसांना त्याचा त्रास होता कामा नये, असं डॉ. बाबासाहेबांचे म्हणणे आहे. हेच आंबेडकरवादाचे सांगणे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आंतरजातीय विवाह हा जाती निर्मूलनाचा एक प्रभावी उपाय वाटतो. कारण रक्‍तसंबंधानेच आपुलकीची भावना निर्माण होते. जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही कारण त्यांचा धर्म त्यांना या चौकटी आखून देतो. डॉ. बाबासाहेबांनी जाती उत्पत्तीचा शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ सिद्धांत मांडला व त्याच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकून जाती नष्ट करण्यास सांगितले. त्यामुळेच आंबेडकरवाद धर्माच्या चौकटी नाकारतो.

आंबेडकरवाद देशातील सर्व शोषित, पीडित आणि वंचितांची “राष्ट्रभाषा’ बनत आहे. डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद आहे, हे सत्य भारतीयांना समजत आहे. यापासून जे दूर आहेत, त्यांना हे सत्य समजेल त्या दिवशी भारतात खऱ्या अर्थाने न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्वाचे राज्य आल्याशिवाय राहाणार नाही. 21 व्या शतकाच्या वाटचालीत भारतातील जातीयवादी लोक जातीयतेचे विष पेरत आहेत. कायद्याने आज अस्पृश्‍यतेला थारा नाही; परंतु ती पाळली जाते हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. याची असंख्य उदाहरणे आहेत. देशात जाती आणि धर्माच्या नावाखाली कुठे ना कुठे अन्याय, अत्याचार, स्त्रियांवर अन्याय चालूच आहेत. अशावेळी देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी आंबेडकरवाद हा बुद्धिप्रामाण्यवादी विचार वाटतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.