नगर | रेमडेसिविरचा काळाबाजार; दोघे गजाआड

भिंगारमधील डॉ. म्हस्के दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा; काही जण पसार

नगर (प्रतिनिधी) – भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संगनमत करून रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून 12 रेमडेसिविर, मोबाइल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

प्रसाद दत्तात्रेय आल्हाट (वय 27, रा. ढाकळीढोकेश्‍वर, ता. पारनेर), रोहीत अर्जुन पवार (वय 22, रा. साकत, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपींनी नावे आहेत. म्हस्के हॉस्पिटलचे डॉ. किशोर दत्तात्रेय म्हस्के, डॉ. कौशल्या किशोर म्हस्के (दोघे रा. वडारवाडी, भिंगार) पसार झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

याबाबत अन्न व औषध निरीक्षक जावेद हुसेन शेख यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील चौघे भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलमधील चैतन्य मेडिकलमधून संगनमत करून करोनावरील औषधे जास्तीच्या दराने विक्री करीत असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती.

प्राप्त माहितीवरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता हॉस्पिटलबाहेरील रुग्णांना परस्पर रेमडेसिविरची विक्री करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पोलीस पथकासह म्हस्के हॉस्पिटलवर काल रात्री आठ वाजता छापा घातला. म्हस्के हॉस्पिटलमधील चैतन्य मेडिकलमधून प्रसाद आल्हाट हा रोहीत पवार यांच्याकरवी डॉक्टरांच्या आर्थिक फायद्याकरिता विना प्रिस्क्रिशन व विना कोविड तपासणी रुग्णांना चार हजार 800 रुपयांचे शंभर एमजीचे रेमडेसिविर इंजेक्शन साडेबारा हजार रुपयांना बाहेर नेऊन विक्री करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन हॉस्पिटलची झडती घेतली असता तिथे 15 रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले. त्यांच्याकडून रेमडेसिविर, एक मोबाईल व एक दुचाकी असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस कर्मचारी राजेंद्र सुद्रिक, मोरे, अडसूळ, तावरे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.