चेन्नई – ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हीलियर्स यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयासाठी कोलका रायडर्स संघासमोर २०४ धावांचं आव्हान ठेवलं.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर विराट कोहली ५ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ रजत पाटीदार देखील झटपट बाद झाला. दोघांना वरुण चक्रवर्तीने बाद केलं. मात्र फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई करताना अर्धशतक केलं. मात्र दुसऱ्या बाजुला असलेला देवदत्त पडीक्कल २५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या एबी डीव्हिलीयर्सच्या साथीत मॅक्सवेलने ५३ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने ४९ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डीव्हिलीयर्सने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत ९ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ७६ धावांची नाबाद खेळी साकारली. त्यामुळे बंगळुरू संघाला २० षटकांत ४ बाद २०४ धावांचा डोंगर उभारता आला.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.