लोणावळा – मुंबईहून जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या नऊ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी (दि. 17) रात्री गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगारीच्या साहित्यांसह 1 लाख 31 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
अशिष चंपालाल संदेशा (वय 39), पुष्पराज विमलचंद राठोड (वय 49), अमित कांतीलाल जैन (वय 45), हसमुख छगनलाल जैन (वय 47), कल्पेश प्रकाशचंद जैन (वय 45), अनिल हिरचंद जैन (वय 47), सुमित रूपचंद जैन (वय 38), प्रवीणकुमार संपतराज जैन (वय 46), जयेश बाबुलाल जैन (वय 45, सर्व रा. मुंबई) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) भादवि कायदा कलम 188, 269 सह साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गोल्ड व्हॅली’ परिसरातील काच बंगल्याशेजारी स्वप्नलोक सोसायटीमध्ये आरोपी सर्वजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी याठिकाणी तपासणी केली असता वरील सर्वजण विनामास्क, “फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करत तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले.
याशिवाय जुगारीच्या ठिकाणी जुगारीचे साहित्य आणि 1 लाख 31 हजार 400 रुपयांची रोकड मिळून आली. जिल्हाधिकारी (पुणे) यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे याठिकाणी जुगार खेळली जात होती. या प्रकरणावरून सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उंडे तपास करीत आहेत.