मुंबई- लवकरच गेल्या महिन्यातील महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज धार्मीक उत्सवामुळे झाले नाही. त्याचबरोबर सराफा बाजारही बंद होता.
शुक्रवारी एक दिवस कामकाज झाल्यानंतर शनिवार आणि रविवारी शेअर बाजारांना सुट्टी आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे.
मात्र महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे गेल्या आठवड्यात निर्देशांक कोसळले होते. महागाईच्या आकडेवारीबरोबरच औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर निर्देशांकांना आगामी काळात दिशा मिळण्याची शक्यता आहे.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स अर्धा टक्क्यांनी म्हणजे 254 अंकांनी वाढून 51,279 अंकावर बंद झाला होता. बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 76 अंकांनी वाढून 15,174 अंकांवर बंद झाला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, या आठवड्यात अमेरिकन रोख्यावरील परतावा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मनात महागाई वाढण्याची भीती कमी झाली आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत.
त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. आता भारतातील महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पुढील परिस्थितीाच अंदाज येऊ शकणार आहे.