जीवनात काही तरी करुन दाखवायचे आहे हे ध्येय उराशी बाळगून आचरण केल्यास जीवनात कोणतीच अडचण येत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाशी जिद्द बाळगल्यास ध्येय साध्य होते. एनकूळ (ता. खटाव) येथील माहेरवाशीण आणि अंबवडे (ता. खटाव) येथील रहिवासी असलेल्या शबनम मुजावर यांनी शिक्षक ते जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावर मारलेली मजल निश्चितच प्रेरणादायी आहे. खटावसारख्या दुष्काळी तालुक्यातून अनेक रत्न उदयास आली असून त्यामध्ये शबनम मुजावर यांच्याही नावाचा समावेश आहे.
खटाव तालुक्यातील एनकूळ येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या शबनम मुजावर यांनी बी. एस्सी बी. एड शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1999 मध्ये खटावच्या लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून शिक्षण क्षेत्रातील सेवेस प्रारंभ केला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपोडे बुद्रुक येथील हायस्कूलमध्ये 2002 मध्ये त्यांना सेवेची संधी मिळाली. लिंब ता. सातारा येथील हायस्कूलमध्ये त्यांनी पाच वर्षे सेवा केली. यादरम्यानच त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. सयाजीराव महाविद्यालयात ज्ञानार्जनाचे काम करत असताना 2011 मध्ये शबनम मुजावर यांची उपशिक्षणाधिकारी वर्ग 2 या पदावर नियुक्ती झाली.
हा क्षण मुजावर यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. प्रतापसिंह हायस्कूल येथे पूर्वी मुख्याध्यापक म्हणून उपशिक्षणाधिकारी दर्जाचा अधिकारी असायचा. या पदावर मुजावर यांची नियुक्ती झाली होती. या हायस्कूलचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या मालमत्ता संरक्षणासाठी मुजावर यांनी पाठपुरावा केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन आणखी प्रभावीपणे चालवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कला महोत्सव, राज्य पुरस्कार, ग्रंथमहोत्सव आदी उपक्रमांमध्ये शबनम मुजावर यांनी उल्लेखनीय काम केले. 2019 मध्ये त्यांची कराड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली. तालुक्याचा विस्तार मोठा असतानाही शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मुजावर यांनी विविध उपक्रम राबवले.
सातारा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्यातील प्रत्येक गावाची खडानखडा माहिती असल्याने मुजावर यांनी शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवून कराड तालुक्याची शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. करोना संकटात कराड तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्त असतानाही शिक्षक, सहकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थी, पालकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करुन त्यांना आधार देण्याचे काम केले. माध्यमिक शिक्षक संघटनेचा कृतीशील अधिकारी व राजा शिवछत्रपती पुरस्काराने मुजावर यांचा गौरव झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच शबनम मुजावर यांची पदोन्नती होवून त्यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या नावलौकिकाला साजेसे काम करण्याचा मानस मुजावर यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना प्रशासकीय सेवेत असलेले पती, मुले व कुटुंबीयांचेही त्यांना नेहमीच सहकार्य लाभले आहे.