पुणे – घरी आलेल्या पाहुण्यांना सुकामेवा, फळफळावल, साग्रसंगीत जेवण जरी दिले तरी “चहा’ विचारला नाही यावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते हे अनेकांनी अनुभवले असेल. त्यामुळे पाहुणे आणि “चहा’ हे समीकरण असतेच असते. त्यातून चहा पिण्याला कोणतीही वेळ नसते, आणि वेळेला चहाच असतो, त्याची तल्लफ ही ते प्यायल्यानेच पूर्ण होते, अशी टॅगलाइन चहाबाज (चहाप्रेमी) ऐकवतातच. त्यामुळे रविवारचा “जागतिक चहा दिवस’ या “चहाबाजां’नी साजरा केला नाही तरच नवल!
जगभरात 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. दैनंदिन जीवनात चहाचे महत्त्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करण्याला सुरूवात झाली. त्यातूनच “चहा’ हा प्रत्येक भारतीयाचा जीवनाचाच एक भाग झाला. बहुतांश लोकांची सकाळ ही चहाने होते. जगात सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांमध्ये चहाचा क्रमांक एक आहे.
जगात अनेक चहाप्रेमी आहेत, जे “चहा घेणार का’ विचारल्यावर “नाही’ म्हणणे पाप समजतात आणि घोटभर का होईना चहा घेतातच. अशा चहाबाजांची संख्या वाढत चालल्याचे इराणी चहाची स्पेशल थ्रीस्टार बनलेली हॉटेले आणि गल्लीबोळात असलेल्या अमृततुल्यांच्या गर्दीवरून दिसून येते.
प्रत्येक घरातील चहाची टेस्ट वेगळी असते. कोणी चहा मसाला वापरेल, कोणी संपूर्ण दुधाचा चहा बनवेल, उकळून बासुंदी सारखे दूध घट्ट करून चहा करेल, कोणाला फक्कड स्ट्रॉंग चहा लागतो, तर कोणाला पाण्यात चहा पावडर आणि कमी दुधातला चहा आवडेल, ब्लॅक टी आवडेल सांगू शकत नाही. मात्र अस्सल चहाबाजाला कोणतीही चव चाखायला आवडतेच.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यासारख्याच दुसऱ्या “चहाबाज’ मित्राला घेऊन सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी नवनव्या अमृततुल्य आणि अस्सल चहाच्या ठेल्यांवर जाणारे अनिरुद्ध पावसकर हे लहानपणापासूनच चहाप्रेमी आहेत. पुणे महापालिकेमध्ये पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. रोजच्या कामाच्या धबडग्यात रविवारी सकाळी फिरत जाऊन नवनव्या अमृततुल्यांमध्ये जाऊन चहा पिणे हा त्यांनी आता त्यांच्या सवयीचा भाग बनवला आहे. अर्थात त्यांना साथ देणारे महापालिकेतील शहर अभियंता कार्यालयातील उपअभियंता जयवंत पवार हेच ते त्यांचे मित्र.
प्रत्येक रविवारची सकाळ यांना नवे अमृततुल्य खुणावत असते. दोघे तेथे जातात आणि तेथे झक्कसपैकी चहाची चव चाखतात. तेथे चहा पितानाचा फोटो काढतात आणि त्याच्याखाली चहाशी संबंधित एक नित्यनुतन नवी टॅगलाइन टाकून सोशल मिडियावर टाकून देतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्यांचा उपक्रम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात याला खीळ बसेल असे वाटले होते, परंतु त्यांनी आपापल्या घरात चहा प्यायल्याचा फोटो काढून तो एकत्रित करून पोस्ट करण्याची शक्कल त्यावेळी काढली. मिळून जमले नाही तर असे काहीतरी पण चहा पिणारच असा त्यांचा चंग आहे.
असे अनेक चहाबाजांमुळे हल्ली चहाच्या दुकानांची संख्या वाढत चालली आहे. त्यातून साखर चालत नाही तर गुळाचा प्या असे म्हणून गुळाच्या चहाची चेन अमृततुल्यही सुरू झाली आहेत. इराणी चहा तर कायमच “फेमस’ आहे. हवाबंद भांड्यात उकळणारा कोरा चहा आणि त्यामध्ये दूध टाकून हा दिला जातो, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच लागते. जी सगळ्यांनाच आवडते असे नाही, परंतु याचा चाहतावर्गही वेगळा आहेच.
आजच्या खास आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्तही पावसकर यांनी फोटो काढून टाकला आहे आणि या दिवसानिमित्त खास टॅगलाइन दिली आहे. “चहा म्हणजे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग. चहाशिवाय आपले जीवन अपूर्णच, सर्व चहा प्रेमींना जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा! चहाला बोलवून बघा, मैत्रीचे एकतरी नाते अगदी हमखास फुलते!