अयोध्या – देशासाठी ऐतिहासिक मानला जाणारा राम मंदिर लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने अयोध्यासह देशभरात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. आज राम मंदिरात विधींची तिसरा दिवस असून रामलल्लाची मूर्तीची मंदिराच्या ‘गर्भगृह’मध्ये ठेवण्यात आली आहे.
रामलल्लाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण अयोध्यानगरीचे वातावरण भक्तीमय झाले आहे. अयोध्येत आज दुपारी 12.20 वाजता रामलल्लाच्या मूर्ती विधीवध गर्भगृहात ठेवण्यात आली. यावेळी ‘जय श्री राम’च्या जयघोषात मूर्ती क्रेनच्या मदतीने मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली.
तसेच अयोध्येत चार दिवस आधीच श्री राम भक्त दाखल होण्यास सुरुवात झाली असून अयोध्येतील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातील प्रमुख साधू-महंतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. ज्यामुळे या सोहळ्यासाठी देशातील सर्वच प्रमुख साधू आणि महंत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील काही प्रमुख साधू-महंतांना सुद्धा या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी आजच राज्यातील सर्व प्रमुख साधू-महंत अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज (ता. 18 जानेवारी) गुरुवारी सकाळी नाशिक येथून राज्यातील प्रमुख साधू-महंत अयोध्येकडे निघाले आहेत. संकेश्वर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्यासह राज्यभरातील साधू-महंत अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दरम्यान, 22 जानेवारीला राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होणार आहे. राम मंदिर सोहळ्यासाठी आतापर्यंत 11 हजारांहून अधिक पाहुण्यांना निमंत्रण दिले आहे. अयोध्येत बुधवारी ‘कलश पूजन’ करण्यात आले. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती, त्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.