न्यूयॉर्क: तेलंगणातील वरंगलामध्ये एकाच दगडाचा वापर करून मनुष्यबळाने अविरत श्रम घेऊन उभारलेल्या पवनसूत हनुमानाच्या भव्य मूर्तीची अमेरिकेतील हॉकेंसिन या शहरात प्रतिष्ठापना करण्यात आली. 25 फूट उंच असलेल्या या मूर्तीचे वजन 30 हजार किलोग्रॅम आहे. ही मूर्ती वरंगल येथे तयार करण्यात आली होती. नंतर जहाजाने अमेरिकेत पाठवण्यात आली.
सुंदर कलात्मक नक्षीकाम करण्यात आलेली ही मूर्ती ग्रॅनाइटच्या एकाच दगडापासून तयार केली आहे. वर्षभराच्या अथक श्रमानंतर 12 मूर्तीकारांनी हनुमानाची ही मूर्ती तयार केली. अमेरिकेत पोहोचल्यानंतर या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात हॉकेंसिन शहरातील 300 पेक्षा जास्त हिंदू कुटुंबांनी सहभाग घेतला.
दहा दिवस पूजाविधी करण्यात आली. या मूर्तीची स्थापना द हनुमान प्रोजेक्टसच्या माध्यमातून करण्यात आली. यात अमेरिकेतील नागरिकांनी सहभाग घेतला.
25 फूट उंचीची भव्य हनुमान मूर्तीला जानेवारीमध्ये हैदराबादहून जहाजाने न्यूयॉर्कला रवाना करण्यात आले होते. जहाज अमेरिकेला पोहचल्यानंतर एका ट्रकमध्ये मूर्ती ठेवून डेलावेयरच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिरापर्यंत नेण्यात आली. बंगळुरूवरून पोहोचलेले पुजारी नागराज भट्टार यांनी मूर्तीची पूजा केली. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी अमेरिकी नेतेही उपस्थित होते.