पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे आगामी मोसमात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली, अशा शब्दात भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. रविवारी स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर तिने हे मत मांडले.
सिंधूने स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकताना अंतिम लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानवर 21-16, 21-8 असा दोन गेममध्ये पराभव केला. तिच्या या विजेतेपदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच येत्या काळात तू नवनवे विक्रम साकार करशील, आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा, असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्याबद्दलही सिंधूने आभार मानले.
आगामी स्पर्धांसाठी आत्मविश्वास वाढला
यंदाच्या मोसमात सातत्याने चांगली कामगिरी होत आहे. सइद मोदी स्पर्धा तसेच आता नुकतीच पार पडलेली स्वीस ओपन स्पर्धा यांतील यश येत्या काळात होत असलेल्या सर्व स्पर्धांसाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरत आहे, असा विश्वासही सिंधूने व्यक्त केला.
टोकियोला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपानला रवाना होत असतानाही पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. पदक जिंकल्यावर मायदेशी परतल्यानंतरही त्यांनी सगळ्या पदक विजेत्यांना बोलावले होते व संवाद साधताना अभिनंदनही केले होते. आम्ही जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा आमच्यावर टीका होत असते मात्र, पंतप्रधानांनी अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहा व परिस्थितीशी दोन हात करुन यश मिळवा हा दिलेला संदेश सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला, असे सिंधू म्हणाली.