पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्यातील “ओएमआर’ शीटची तपासणी करण्यासाठी परीक्षा परिषदेतील पाच बड्या अधिकाऱ्यांचे खास पथकही पुणे पोलिसांच्या मदतीसाठी पाठवले आहे.
“टीईटी’च्या निकालात भानगडी करून अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लाखो रुपये घेऊन उत्तीर्ण केले आहे. यात 7 हजार 800 उमेदवारांच्या निकालात घोटाळे झाल्याची बाब पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. यात काही उमेदवारांना “ओएमआर’ शीटचा काहीच विचार न करता थेट आवश्यक तेवढे गुण देवून पास केले आहे. काही उमेदवारांच्या “ओएमआर’शीटमध्ये स्कॅनिंग करताना छेडछाड करण्यात आलेली आहे. काही उमेदवारांना थेट बोगस प्रमाणपत्रच देण्याचा अजब कारभारही केलेला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक अश्विन कुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक सौरश त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, शालेय शिक्षण विभागातील तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर आदींसह काही कर्मचाऱ्यांनाही अटक झालेली आहे. यात प्रामुख्याने सुपे याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडलेले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून “टीईटी’ परीक्षेच्या घोटाळ्यातील “ओएमआर’ शीट तपासण्यासाठी सुरुवात केली आहे. या कामकाजासाठी परीक्षा परिषदेतील एका अधिक्षकासह बारा कर्मचारी पोलिसांनी मदतीला घेतले होते. मात्र “ओएमआर’ शीटच्या तपासणीचे कामकाज अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे पोलिसांनी परीक्षा परिषदेकडे आणखी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.
त्याची दखल घेत परीक्षा परिषदेने थेट उपायुक्त, सहायक आयुक्त, तीन अधिक्षक अशा काही अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तत्काळ पोलिसांच्या सहकार्यासाठी पाठविले आहे. यामुळे आता काहीच दिवसात “ओएमआर’ शीटची तपासणी पूर्ण होणार आहे. या तपासणीनंतर काही मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यताही वर्तविण्यात येवू लागली आहे.