मुंबई – गेल्या पंधरा दिवसांत आफ्रिकन देशातून किमान एक हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले असून त्यांची सध्या शोधाशोध सुरू आहे. त्यातील 466 जणांची माहिती मुंबई महापालिकेकडे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी शंभर जणांचे महापालिकेने स्वॅब कलेक्शन केले आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी पीटीआयला सांगितली.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाचा नवीन करोना व्हायरस आढळून आल्यानंतर सध्या जगभर धास्ती निर्माण झाली आहे. त्यातून सगळीकडेच दक्षता घेतली जात असून मुंबईतही त्या अनुषंगाने काही उपाययोजना सुरू आहेत.
सध्या या प्रक्रियेत गेल्या पंधरा दिवसांत आफ्रिकन देशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सुरेश ककाणी यांनी सांगितले की, एअरपोर्ट ऍथॉरिटीने आम्हाला एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची माहिती दिली आहे. पण त्यापैकी त्यांनी केवळ 466 प्रवाशांचीच यादी आम्हाला दिली आहे. या प्रवाशांपैकी जे कोणी पॉझिटीव्ह येतील त्यांचे जिनॉम सिक्वेन्सिग केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
संसर्ग झालेल्या प्रवाशांना महापालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. नवीन विषाणुंची लागण होंण्याचे प्रमाण वाढलेच तर त्यांच्यासाठी महापालिकेने आपली पाच रूग्णालये आणि एक जंबो हॉस्पिटल तयार ठेवले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.