नवी दिल्ली – गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 80 पैशांणी वाढ शनिवारी करण्यात आली. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचे भाव 98 रुपये 61 पैसे तर डिझेलचे भाव 89 रुपये 87 पैसे इतके होतील.
साडे चार महिने भाववाढ थांबवल्यानंतर 22 मार्चला पेट्रोलच्या दरांचा पहिल्यांदा फेरविचार करण्यात आला होता. 2017 मध्ये दर फेरविचार कायदा लागू झाल्यानंतर एवढ्या वेगाने दरवाढ होण्याची ही पहिली वेळ आहे. या दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन रुपये 20 पैशांनी महागले आहेत.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार नोव्हेंबरपासून दरवाढ थांबवण्यात आली होती. त्याकाळात क्रुड ऑईलचे दर प्रती बॅरल 30 डॉलर्सने वाढले होते. त्यामुळे 10 मार्चला निकाल लागल्यानंतर तातडीने दरवाढ अपेक्षित होती. मात्र त्याला काही काळ थांबवण्यात आली.
तेल कंपन्यांनी कच्च्या इंधन दर 92 डॉलर प्रती बॅरलवरून 117 डॉलर एवढे वाढल्यावरही तब्बल 137 दिवस भाववाढ केली नव्हती. त्यामुळे तो फरक आता ते ग्राहकांकडून वसूल करत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या काळात सरकारी कंपन्यांना सुमारे 19 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचा मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हीसचा अंदाज आहे. त्यामुळे डिझेल 13.1 ते 24.9 रुपये प्रती लिटर आणि पेट्रोल 10.6 ते 22.3 रुपये प्रती लिटर दराने वाढवणे आवश्यक असल्याचे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे म्हणणे आहे.