राजगुरूनगर – राजगुरूनगर एसटी आगारातील कार्यशाळेतील कार्यालयात व आगारव्यवस्थापक यांच्या कार्यालयात कार्यरत एका कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली असून ते स्वत:हून विलगीकरणात गेले आहे. तर प्रवाशांचीही धास्ती वाढली आहे. राजगुरुनगर एसटी बसस्थानकात प्रवाशी सोशल डिस्टन्स पाळत नसल्याचे निदर्शनास येत असून बसस्थानक परिसरात हॉटेल व स्टॉल सुरू केल्यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे.
आलेले प्रवासी येथील कॅन्टीन जवळील बेसिन-नळकोंडाळे नादुरुस्त आहे तेथे थुंकणे, तंबाखू-पान खाऊन पिचकाऱ्या मारणे असे प्रकार करत असल्याने करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर याच नळावर हॉटेलचे कामगार भांडी विसळत असतात त्यामुळे प्रवाशांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाला अवकळा आल्याचे दिसून येते.
बसस्थानकात झोपलेले तळीराम, हॉटेलचा कचरा भरून वाहत असलेले फलाटावरचे कचऱ्याचे डबे असे दृष्य येथे नित्य दिसत आहे. आगारात करोनाग्रस्त कर्मचारी सापडल्याने करोनाच्या भीतीने एसटीचे कर्मचारी भेदरलेल्या अवस्थेत काम करताना दिसतात. संबंधितत करोनाग्रस्त कर्मचाऱ्याचे कुटुंबीयही विलीगीकरणात असल्याचे आगारातील कर्मचाऱ्यानी सांगितले.