नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या तीन दिवसांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशियाला रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान रशियाचे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी राजनाथ यांची रशियाचे संरक्षण मंत्री सर्जी शोयगू यांच्याबरोबर चर्चा होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या 8 सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत दहशतवाद आणि कट्टरतावादासह प्रादेशिक सुरक्षेसमोरील आव्हाने आणि त्या आव्हानांचा सामना करण्यासाठीच्या सामूहिक उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शांघाय सहकार्य संघटनेमधील प्रभावी सदस्य असलेल्या भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभुमीवरच ही बैठक होत आहे. या बैठकीला चीनचे संरक्षण मंत्री जेन वेई फेंग आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खट्टक हे देखील या बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र या बैठकीच्या वेळी सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दौऱ्यात दुसऱ्या महायुद्धात मिळलेल्या विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशन, कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायजेशन आणि कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्सच्या बैठकींना उपस्थित राहणार आहोत, असे राजनाथ सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भारत आणि रशियामध्ये संरक्षण भागीदारी असून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
भारतात एके-203 रायफल्स बनविण्याच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रस्तावाला या चर्चेदरम्यान अधिकृतपणे अंतिम स्वरूप देण्याची अपेक्षा आहे. तसेच रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र लवकर मिळण्याबाबतही राजनाथ सिंह चर्चा करणार आहेत. या क्षेपणास्त्रांचा पहिला हप्ता 2021 च्या अखेरीपर्यंत भारताला मिळणार आहे. या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी भारताने रशियाबरोबर 2018 साली 5 अब्ज डॉलरचा करार केला आहे.