सोरतापवाडी -उरूळी कांचन (ता. हवेली) येथील 47 वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. महिलेला कदमवाकवस्ती येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाबतची तपासणी केल्यानंतर महिलेला करोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल आला आहे. तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महिलेच्या संपर्कातील 19 जणांना होम क्वारंटाइन, तर 14 जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये पाठविले आहे, असे उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचेता कदम यांनी सांगितले. दरम्यान, कदमवाकवस्ती येथील हॉस्पिटलमधील 38 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. बाधित महिलेला बऱ्याच दिवसांपासून पोटाचा आजार आहे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरचे उपचार घेतले होते.
ही महिला उरुळी काचंन येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. कोंढव्यातील एका ट्रस्टच्या सेंटरमध्ये पोटाचे स्कॅन करण्यासाठी गेली होती. तेथून त्यांनी हडपसरमधील एका हॉस्पिटलमध्ये आपले रिपोर्ट दाखवून उपचाराची चौकशी केली; पण तिथे काही ताळमेळ बसला नाही म्हणून उरुळीतील उपचार घेत असलेल्या खासगी डॉक्टरला रिपोर्ट दाखविले. त्यांनी तात्काळ कदमवाकवस्ती येथील दवाखान्यात जाण्यास सांगितले. गुरुवारी (दि. 16) दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तपासणी केली असता ही महिला करोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आले.
पुढील उपचारासाठी नायडू हॉस्पिटलला दाखल केले आहे. दरम्यान, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी या महिलेच्या कदमवाकवस्ती येथील दवाखान्यातील संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली आहे., ज्या रुग्णालयात बाधित महिला होती, त्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केली. बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व स्टाफची माहिती मागितली आहे. त्या सर्वांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.