#INDvWI : भारताचा वेस्ट इंडिजवर २-१ ने मालिका विजय

कटक : सलामीवीर रोहित शर्मा, के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ४ गडी आणि ८ चेंडू राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. आजच्या सामन्यात ८५ धावा करणारा विराट कोहली सामनावीर तर मालिकेत २८५ धावा करणारा रोहित शर्मा मालिकावीर ठरला.

दरम्यान, गेल्या १५ वर्षात भारतीय संघाने मायदेशात सलग दोन एकदिवसीय मालिका गमावलेल्या नाहीत आणि आज विडींजवर मालिकाविजय मिळवत हा विक्रम अबाधित राखला आहे तर दुसरीकडे १३ वर्षानंतर भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी विंडीजने गमावली आहे.

विजयासाठी ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी संयमी सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. रोहित शर्माला जेसन होल्डरने शाइ होपकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. रोहितने ६३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६३ धावा केल्या. त्यानंतर विराटने राहुलसोबत ४५, अय्यरसोबत २१, पंतसोबत १३ , केदारसोबत २७ आणि जडेजासोबत ५६ धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.

श्रेयस अय्यर ७, रिषभ पंत ७ केदार जाधव ९ धावांवर बाद झाला. के एल राहुलने ८९ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ७७ तर विराटने ८१ चेंडूत ९ चौकारासह शानदार ८५ धावा करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानंतर शेवटच्या क्षणी रविंद्र जडेजाने ३१ चेंडूत नाबाद ४० आणि शार्दुल ठाकूरने ६ चेंडूत नाबाद १७ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

वेस्ट इंडिजकडून कीमो पाॅलने ३ तर काॅटरेल, होल्डर आणि जोसेफने १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यानंतर वेस्टइंडिजने संयमी सुरूवात केली. विंडीजच्या सुरूवातीच्या चार फलंदाजानी एविन लुइस २१, शाइ होप ४२, शिमरन हेटमायर ३७ आणि राॅसटन चेजने ३८ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३१.३ षटकांत ४ बाद १४४ पर्यंत नेली.

त्यानंतर निकोलस पूरन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटच्या षटकांत तूफान फटकेबाजी करत संघाची धावसंख्या ५० षटकांत ५ बाद ३१५ पर्यंत नेली. निकोलस पूरन याने ६४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारासह ८९ धावांची खेळी केली तर कायरन पोलार्डने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारासह नाबाद ७४ धावांची खेळी केली.

भारतीय गोलंदाजानी सुमार कामगिरी केली. शेवटच्या ५ षटकात विंडीज फलंदाजानी ७७ धावा चोपल्या. भारताकडून गोलंदाजीत नवदीप सैनीने पदार्पणाच्या सामन्यात १० षटकात ५८ धावा देत २ गडी बाद केले. तर शार्दुल ठाकूरने ६६/१, मोहम्मद शमीने ६६/१ आणि रविंद्र जडेजाने ५४/१ गडी बाद केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.