#INDvENG : ॲशेसपेक्षाही महत्त्वाची मालिका – स्वान

चेन्नई  – ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये आता पूर्वीसारखा बलाढ्य राहिलेला नाही. उलट भारतीय संघानेच गेल्या संपूर्ण दशकात सातत्यपूर्ण कामगिरीने वर्चस्व राखले आहे. इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. ही मालिका ॲशेसपेक्षाही महत्वाची आहे, असे मत इंग्लंडचा माजी कसोटीपटू ग्रॅमी स्वान याने व्यक्‍त केले आहे.

ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने नमवल्यास ते ॲशेस विजयापेक्षाही महत्त्वाचे ठरेल. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली अनुपलब्ध असतानाही भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा संघ आता तेवढा बलाढय संघ मानला जात नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला ऍशेस मालिकेपेक्षा भारताविरुद्धच्या मालिकेची उत्सुकता असते. ऍशेस मालिकेची उत्कंठा आता इतिहासजमा झाली आहे. भारताला त्यांच्या देशात नमवणे, हे कौतुकास्पद यश ठरेल. 2012 साली आम्ही भारताला भारतातच नमवण्याची किमया साधली होती. तेव्हापासून मायदेशात ते अपराजित राहिले आहेत. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती हेच इंग्लंडपुढील आव्हान असेल.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर दाखल होत असून येत्या 5 फेब्रुवारीपासून येथे पहिल्या कसोटी सामन्याने या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात भारत व इंग्लंड यांच्यात चार कसोटी, पाच टी-20 व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाहोणार आहे.

ॲण्डरसन लक्षवेधी ठरेल …

इंग्लंडचा संघ भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲण्डरसन याने अत्यंत भेदक गोलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या कसोटीत सहा गडी बाद करत आपण आशियाई खेळपट्टीवरही प्रभावी ठरू शकतो असाच इशारा दिला आहे. यापूर्वीही त्याची भारताविरुद्धची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली असून या मालिकेतही तोच लक्षवेधी ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.