#INDvENG : पहिल्या दोन्ही कसोटी प्रेक्षकांविनाच

चेन्नई  – येथील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांविना होणार आहेत, असे स्पष्टीकरण तमिळनाडू क्रिकेट संघटनेने दिले आहे. करोनाच्या साथीमुळे बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चेपॉकवरील दोन कसोटी सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे संघटनेचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी सांगितले. 

बीसीसीआयने 20 जानेवारीला पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार सामने बंदिस्त स्टेडियमवर होणार असून, प्रेक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्यांना प्रेक्षक, विशेष निमंत्रीत अतिथी व सदस्यांना उपस्थित राहता येणार नाही, असेही संघटनेने सांगितले आहे.

भारत व इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला सुरू होईल, तर दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडचा संघ 27 जानेवारीला चेन्नईच्या बायोबबल सुरक्षेत दाखल होईल. केंद्र सरकारच्या नव्या सुचनेनुसार क्रीडा स्पर्धांसाठी स्टेडियम वक्रीडा संकुलात 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही सामन्यांसाठी बीसीसीआयने सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. च्या निर्णयामुळे प्रेक्षकांना क्रिकेट सामने मैदानावर जाऊन पाहण्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

भारतीय संघ जाणार विलगीकरणात …

ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यावर आता मायदेशात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी नियोजन करण्याकरता भारती संघ आठवडाभर विलगीकरणात राहणार आहे.
आमची मालिका इंग्लंडविरुद्ध आहे. त्यापूर्वी आम्ही एक आठवडा विलगीकरणात राहणार आहोत. या कालावधीत आम्ही आमचे धोरण ठरवू, असे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी सांगितले.

इंग्लंड संघ भारतात खेळत असला, तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक सामना आव्हानात्मक असतो. ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडची फलंदाजी चांगली आहे असे म्हणता येणार नाही. पण, ऑस्ट्रेलियात आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो यात शंका नाही. पहिल्या कसोटीत 36 धावांत गारद झाल्यानंतर आम्ही खरे तर निराश झालो होतो. त्यातून बाहेर पडायला आम्हाला दोन दिवस लागले. मैदानावर बाहेर पडलो तेव्हा आम्ही घडले ते विसरून गेलो आणि नव्याने सुरवात केली. आता आम्हाला यश विसरून इंग्लंडविरुद्ध नवी सुरवात करायची आहे, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.