Archery, Taipei Open Indoor World Series : महाराष्ट्राचा नावाजलेला तिरंदाज प्रथमेश जावकर याने जागतिक इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली व एका अनोख्या कामगिरीची नोंद केली. पुरुष गटातील कंपाउंड प्रकारात प्रथमेशने सुवर्णयश प्राप्त केले. तसेच महिला गटात पंजाबची स्टार खेळाडू परनीत कौर हीनेही याच गटात सुवर्णपदक मिळवले.
प्रथमेश याने पहिल्या फेरीत चोऊ हुंग याचा १४८-१४५ असा पराभव केला तर, त्यानंतर भारताच्याच भगवान दास याच्यावर १५०-१४५ असा विजय प्राप्त केला. उपांत्यपूर्व फेरीत प्रथमेशने आपलाच देश सहकारी खेळाडू अभिषेक वर्माचा १४७-१४६ असा पराभव केला. प्रथमेशने अंतिम फेरी गाठताना उपांत्य फेरीत अमन सैनीचे आव्हान १४८-१४७ असे संपूष्टात आणले.
Sports In Pune : लक्ष्य स्पोर्ट्स-अमल्गम स्टीलतर्फे मुलींसाठी ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ची घोषणा..
प्रथमेश याने अंतिम लढतीत नेदरलँडच्या माईक श्लोसेर याच्यावर १४९-१४८ असा अवघ्या एका गुणाने मात करत विजेतेपदावर नाव कोरले. श्र्लोसेरला रजतपदकावर समाधान मानावे लागले. तर अमन सैनीने भारताच्याच कवलप्रीत सिंग याचा १४७-१४६ असा पराभव केला व ब्रॉंझपदक मिळवले. भजन कौर व गोल्डी मिश्रा यांनी या स्पर्धेत अनुक्रमे २१ वर्षांखालील पुरुष व महिला गटात अनुक्रमे सुवर्ण व ब्राँझपदके पटकावली.
महिला गटात दोन्ही पदके देशालाच
परनीत कौरने अंतिम फेरीच्या सामन्यात आपलीच देश सहकारी ज्योती सुरेखा वेन्नम हीच्यावर १४६-१४५ असा एका गुणाने विजय मिळवला. परनितला सुवर्ण तर ज्योतीला रजतपदक मिळाले. यंदाच्या मोसमात भारताच्या तिरंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. या एकाच वर्षात आपल्या तिरंदाजांनी पदकांचे शतक (१०५) साकार केले.