पणजी :- महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदकनिश्चिती केली आहे. याचप्रमाणे महिला संघापुढे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल.
पोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उत्तर प्रदेश संघाला २३६-२२४ अशा फरकाने हरवले. त्यानंतर हरयाणा संघाचा २३८-२३६ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. या संघात प्रथमेश जावकर, मानव जाधव, हर्ष बोराटे, पार्थ कोरडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला सुवर्णपदकासाठी ५ नोव्हेंबरला दिल्ली संघाशी भिडावे लागेल. समीर म्हस्के आणि अमर जाधव या संघाला मार्गदर्शन करीत आहेत, तर गिरीश कुकडे व्यवस्थापक आहेत.
National Games 2023 (Swimming) : डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्यपदक…
महाराष्ट्राच्या महिला संघाने गोव्याला २३२-२१० असे पराभूत केले. मात्र पंजाब संघाकडून त्यांना हार पत्करावी लागली. पूर्वशा शेंडे, मधुरा धामणगावकर, तेजल साळवे, प्रितिका प्रदीप यांचा महाराष्ट्राच्या संघात समावेश आहे. या संघाची कांस्यपदकाची लढत ५ नोव्हेंबरला मध्य प्रदेश संघाशी होणार आहे.