Stock Market updates: गेल्या तीन दिवस शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळाली. आज शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी होती. एफएमसीजी, आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही खरेदीमुळे बाजारात उत्साह वाढला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 497 अंकांच्या उसळीसह 71,683 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160 अंकांच्या उसळीसह 21,622 अंकांवर बंद झाला.
BSE मार्केट कॅपमध्ये वाढ –
शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. आज बाजार बंद होताना, बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 373.65 लाख रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 369.75 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 716 अंकांच्या उसळीसह 47,815 अंकांवर बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक 167 अंकांच्या उसळीसह 15,487 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी फार्मा एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग आजच्या व्यवहारात तेजीने बंद झाले. फक्त बँकिंग आणि मीडिया शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 23 वाढीसह आणि 7 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 42 समभाग वाढीसह बंद झाले आणि 8 घसरले.
आजच्या व्यवहारात भारती एअरटेल 3.52 टक्के, एनटीपीसी 3.04 टक्के, टेक महिंद्रा 2.56 टक्के, टाटा स्टील 2.40 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. इंडसइंड बँक 3.24 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 1.08 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा 0.66 टक्क्यांनी घसरून बंद झाले.