नवी दिल्ली :- इंडियन सुपर लीगमधील संघांनी आपल्या संघातील राष्ट्रीय खेळाडूंना वेळेवर रीलीज करावे, अशी मागणी केल्यावर भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्यावरच टीका होऊ लागली आहे.
मात्र, मी अशा कोणत्याही टीकेला भीत नाही व सत्य तेच बोलतो. येत्या काळात अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी भारतीय फुटबॉल संघाला कसून सराव करावा लागणार आहे.
मात्र, याच काळात होत असलेल्या इंडियन सुपर लीगमधील काही संघात देशाचे प्रतिनिधित्व करत असलेले अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत. तेच जर सरावात अनुपस्थित राहिले तर आम्ही स्पर्धांचे नियोजन कसे करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
आता त्यांच्या याच मागणीवर भारतीय फुटबॉल महासंघ व लीगमधील संघ काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.