नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील भारताचे राजदूत आणि दूतावासातील सुमारे 120 कर्मचाऱ्यांना भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे. लष्कराच्या मालवाहू सी-17 विमानातून त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे.
परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील धोकादायक स्थिती पाहिल्यानंतर भारतीय दूतावासातील सर्वांना तातडीने मायदेशी परत आणण्याचा निर्णय त्वरेने घेतला गेला. सोमवारी पहिल्या विमानातून काही कर्मचारी भारतात आणले गेले आहेत. आज दुसऱ्या विमानातून उर्वरीत भारतीयांना परत आणण्यात आले आहे.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी पलायन केल्यानंतर रविवारी तालिबानने संपुर्ण अफगाणिस्तानचा कब्जा केला. त्यामुळे काबुल मध्ये अराजकाची स्थिती निर्माण झाली होती. तेथील स्थितीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने लक्ष ठेवले.
भारतीय दूतावासातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुखरूप परत आणणे हे या परिस्थितीत अत्यंत मोठे आव्हान होते. अफगाणिस्तानात जे हिंदु आणि शिख नागरीक आहेत त्यांच्या नेत्यांशीही विदेश मंत्रालयातर्फे सतत संपर्क केला जात असून त्यांनाही भारतात परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तेथील नागरीकांना भारताच्या विदेश मंत्रालयाशी संपर्क साधता यावा यासाठी एक स्वतंत्र फोन लाईनही सुरू करण्यात आली आहे.