नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत आमचा विजय हा निश्चितच आहे. एवढेच नव्हे तर माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. यासाठी आम्ही 30 वर्षे लागू देणार नाही. ही लवकरच करू, ही मोदी गॅरंटी आहे, असेही म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीतच दिसतील अशा शब्दांत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी म्हणाले, यंदाचा आपला प्रजासत्ताक हा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. तसेच नव्या संसदेतील हे चित्र अविस्मरणीय आहेच. सोबतच समोर विरोधी बाकावर बसलेले विरोधक हे पुढील अनेक वर्षे तसेच विरोधी बाकावरच दिसतील. एवढेच नव्हे तर पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील. विरोधकांकडे निवडणूक लढविण्याचीही ताकदच नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
आजकाल विरोधक ज्या प्रकारे मेहनत करत आहेत, मला ठाम विश्वास आहे की, देवाच्या रूपातील जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही ज्या उंचीवर आहात त्यापेक्षा तुम्ही उंच जाल आणि प्रेक्षक गॅलरीमधूनही गायब व्हाल. मी पाहतो की तुमच्यापैकी अनेकांनी आगामी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली आहे. तर काहींनी मागील निवडणुकीत जागा बदलली होती. आगामी निवणुकीतही ते निवडणुकीत उभं राहण्यासाठी जागा शोधत आहेत. काहीजण तर लोकसभेतून राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. एकूणच विरोधक परिस्थिती ओळखून त्यानुसार मार्ग काढत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.