अहमदाबाद – भाजपचे माजी आमदार आणि बडोद्यातील भाजप नेते बाळकृष्ण पटेल यांनी रविवारी भाजपला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर आणि माजी अध्यक्ष सिद्धार्थ पटेल यांनी पक्षाच्या मुख्यालयात बाळकृष्ण पटेल यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले.
बाळकृष्ण पटेल यांनी 2012 ते 2017 दरम्यान वडोदरा जिल्ह्यातील दाभोई मतदारसंघाचे भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. 2012 मध्ये ते कॉंग्रेसचे सिद्धार्थ पटेल यांचा पराभव करून आमदार बनले होते.
कॉंग्रेस प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा आणि तालुका पातळीवर भाजपला बळकट करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे मेहनत घेतली होती. मी विद्यमान आमदार असतानाही मला 2017 च्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले नव्हते. माझ्या मुलालाही तिकीट नाकारण्यात आले होते.
भाजप श्रेष्ठींनी सातत्याने अन्याय केल्याने आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. कॉंग्रेसकडून आपल्याला किंवा मुलाला तिकीटाची अपेक्षा नाही असेहीं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.