नवी दिल्ली – जागतिक महामारी ठरलेल्या करोना संसर्गाने भारतात थैमान घातलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, की रुग्णांना मदत मिळणंही कठीण झालं आहे. जगभरातून करोना संकट काळात भारताच्या मदतीला हात पुढं येत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी यात आघाडी घेतली आहे. मात्र ज्या भारतीय खेळाडूंना भारतीयांनी डोक्यावर घेतलं ते आजी-माजी खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्याचं चित्र आहे.
एक दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने भारतातील ऑक्सिजन तुटवडा पाहता, तब्बल ३७ लाखांची मदत पीएम केअर फंडात जमा केली. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली देखील भारताच्या मदतीसाठी सरसावला आहे. ब्रेट लीने भारताच्या मदतीसाठी १ बीटकॉईन अर्थात ४१ लाख रुपये डोनेट केले आहे. त्याने या संदर्भात ट्विट केलं आहे.
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— Brett Lee (@BrettLee_58) April 27, 2021
तो म्हणाला,”भारत हे माझं दुसरं घरच आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत आणि निवृत्तीनंतर येथील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाचं माझ्या हृदयात वेगळं स्थान आहे. या संकटकाळात लोकांना मरताना पाहून मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी मला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळतेय, हे मी माझं भाग्य समजतो. मी एक बिटकॉईन www.cyptorelief.in ला दान करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून भारतातील विविध हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.