पुणे : माजी सैनिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या एक्स-सर्व्हिसमेन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस) केंद्रांवर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे आणि खडकीसहित देशातील तब्बल 50 ईसीएचएस केंद्रावर कर्मचारी भरती होणार आहे.
सध्याच्या कोरोना संकटांवर मात करण्यासाठी देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या ईसीएचएस पॉलिक्लिनिकमध्ये अधिकृत कराराव्यतिरिक्त अतिरिक्त अधिकार असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, ड्रायव्हर आणि चौकीदार या पदांवर कर्मचारी भरती केली जाणार आहे. या नियुक्त कर्मचाऱ्यांचा कालावधी 3 महिन्याचा असणार असून, या मंजुरीची वैधता 15 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे.
या माध्यमातून वैद्यकीय उपचार घेणाऱ्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीच्या परिस्थितीत रात्रीच्या वेळीही तातडीने वैद्यकीय सेवेची उपलब्धता सुनिश्चित होईल. कर्मचारी भरती केल्या जाणाऱ्या ईसीएचएस केंद्रांमध्ये पुणे शहर, लोहगाव आणि खडकी येथील केंद्रांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त लखनऊ, दिल्ली कॅंट (बीएचडीसी), बेंगळुरू (अर्बन), देहरादून, कोटपुतली, अमृतसर, मेरठ, चंडीगड, जम्मू, नवी दिल्ली (लोधी रोड), सिकंदराबाद, आग्रा, अंबाला, ग्रेटर नोएडा, गुरदासपूर, त्रिवेंद्रम, जालंधर, कानपूर , गुडगाव, गुडगाव (सोहना आरडी), होशियारपूर, मोहाली, चंडीमंदिर, अलाहाबाद, गाझियाबाद (हिंडन), पठाणकोट, जोधपूर, लुधियाना, रोपार, तरनतरन / पट्टी, कोलकाता, दानापूर (पाटणा), पालमपूर, बरेली, कोल्हापूर, योल, विशाखापट्टणम, जयपूर, गुंटूर,बराकपूर, चेन्नई, गोरखपूर, पटियाला, नोएडा, भोपाळ, कोची, वेल्लोर आणि रांची याठिकाणीही कर्मचारी भरती केली जाणार आहे.