लंडन – लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थी संघांच्या निवडणुकीत झालेल्या द्वेषमूलक प्रचाराबाबत अर्थात हेट कँपेनबाबत भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा यांनी खेद व्यक्त केला आहे. भारतातील सध्याच्या नेतृत्वाकडून होत असलेला देशाचा विकास ज्यांना मानवत नाहीये अशा लोकांकडून आपल्याला लक्ष्य करण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी लंडन येथे भारतीय दुतावासासमोर खलिस्तानवाद्यांनी निदर्शने केली होती. त्यावेळी भारताचा तिरंगा खाली पडला होता. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून प्राणांची पर्वा न करता सत्यम निदर्शकांच्या गर्दीत शिरले होते आणि त्यांनी तिरंगा उचलला. या घटनेनंतर सत्यम एकदम प्रकाशझोतात आले.
सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये आपण खलिस्तानवाद्यांना दहशतवादी म्हटले होते त्यामुळे आपल्याला लक्ष्य केले गेले असे त्यांनी सांगितले. ते म्हणतात की भारत हा माझा देश आहे आणि मी माझ्या देशाची वकीली करत राहणार. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की सरचिटणीस पदासाठी मी उमेदवारी अर्ज भरला होता.
मात्र १५ मार्च रोजी माझे पोस्टर फाडण्यात आले. त्याबद्दल आम्ही संबंधितांना कळवले आणि नवे पोस्टर लावले. मात्र या पोस्टरमध्येही माझ्या चेहऱ्यावर क्रॉसचे चिन्ह काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी अनेक ग्रुपमध्ये माझ्या विरोधात मेसेज पाठवण्यात आले. मला भारतीय जनता पार्टीचा समर्थक आणि फॅसिस्ट म्हटले गेले.
तुमच्या विरोधातील ही मोहीम कोणा भारतीयाने सुरू केली होती की विदेशी विद्यार्थ्याने असे विचारल्यावर पहिला मेसेज एका भारतीयाचा होता असे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या विरोधातील या मोहीमेत सहभागी असलेले बहुतांश लोक भारतीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.