काठमांडू – एकीकडे भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानकडून पराभूत झालेला असताना भारतीय महिलांच्या फुटबॉल संघाने मात्र, पाकिस्तानचा पराभव केला. (India beats Pakistan 3-0 in SAFF Women’s Championship 2022_ या विजयाच्या जोरावर भारतीय महिला संघाने येथे सुरु असलेल्या सॅफ महिला फुटबॉल विजेतेपद स्पर्धेत विजयी सलामी दिली.
बुधवारी झालेल्या पहिल्याच लढतीत गतविजेत्या भारतीय महिला फुटबॉल संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-0 असा दारूण पराभव केला. भारताने या अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग 27 सामने जिंकत वर्चस्व कायम राखले.
या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार मारिया जमील खानने स्वयं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दांगमेई ग्रेसने पहिल्या हाफमध्ये गोल करत भारतीय संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ संपल्यावर सामन्यात अतीरिक्त वेळ देण्यात आली. त्यात भारताच्या सौम्या गगुलोथने गोल करत भारताचा 3-0 असा विजय साकार केला. या स्पर्धेत आता भारताचा सामना शनिवारी मालदीवशी होणार आहे.