मेलबर्न – येथे सुरु असलेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावातील यजमान ऑस्ट्रेलियावरील 131 धावांच्या आघाडी नंतर भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिअयन फलंदाजांनी नांगी टाकली असल्याचे दिसून आले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 133 धावा झाल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियाकडे 2 धावांची आघाडी असून, चौथ्या दिवशी ते किती धावा करतात, त्यावर भारताचा विजय अवलंबून असेल. हा सामना जिंकल्यास भारत मालिकेत बरोबरी करु शकतो.
कालच्या 5 बाद 277 धावांवरुन पुढे खेळताना भारताचा डाव आज सकाळी उपहारापूर्वी 326 धावावर संपला. कर्णधार अजिंक्य रहाणे कालच्या 104 धावांमध्ये 8 धावांची भर घालू शकला. एक चोरटी धाव घेताना रहाणे धावबाद झाला. याचवेळी रविंद्र जाडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर जाडेजाही फार काळ टिकला नाही. त्याला 57 धावांवर मिशेल स्टार्कने कमिन्सकरवी झेलबाद केले. मग रविचंद्रन आश्विन (19) आणि उमेश यादव (9) यांनी थोडाफार प्रतिकार केला. बुमराह शून्यावर बाद झाला. तर सिराज नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने 78 धावांत तर नाथन लिऑनने 72 धावांत तीन-तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्सने 80 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या चहापानापर्यंत 2 बाद 65 धावा झाल्या होत्या. त्यावेळी मॅथ्यु वेड आणि स्टीव्हन स्मिथ अनुक्रमे 27 आणि 6 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलिया त्यावेळी 66 धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव सुरु केल्यानंतर 4 धावांवर ज्यो बर्न्सचा झेल ऋषभ पंतने घेतला तेव्हा गोलंदाज होता उमेश यादव. नंतर संघाच्या 42 धावा फलकावर लागलेल्या असताना मार्नस लेबुशेनचा झेल अजिंक्य रहाणेने घेतला, त्यावेळी गोलंदाज होता रविचंद्रन आश्विन. लाबुशेनने 28 धावा केल्या.
पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या स्टीव्हन स्मिथकडून या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा असताना जसप्रित बुमराहच्या खाली राहिलेल्या चेंडूवर तो चकला आणि अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला.
मग मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडचा झेल मयंक आग्रवालने दुसऱ्या स्लिपमध्ये घेतला. हेडने 17 धावा केल्या. कर्णधार टीम पेन संघाचा डाव सावरेल असे वाटत असतानाच, रविंद्र जाडेजाच्या उसळत्या चेंडूने पेनच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पेनला जेमतेम खाते उघडता आले. दिवस अखेरीस कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स अनुक्रमे 17 आणि 15 धावांवर नाबाद होते.