नवी दिल्ली – कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अश्या शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केले.
गेल्या शंभर वर्षात करोना सारखी साथ जगाने पाहिलेली नाही आणि अश्या तऱ्हेच्या आव्हानाचा सामना शक्तीशाली देशांनाही एकट्याने करता येणे अशक्य होते. माणुसकी आणि माणसाच्या भल्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मार्गक्रमणा करायला हवी हा या साथीने शिकवलेला मोठाच धडा आहे. आपल्याला एकमेकांकडून शिकणे तसेच आपल्याला सापडलेली योग्य दिशा दुसऱ्याला दाखवणे भाग आहे असेही त्यांनी सांगितले.
अनुभव, कौशल्य आणि संसाधने यांचे जागतिक पातळीवर सामायिकीकरण करण्याप्रती भारत कटीबद्ध आहे. करोना साथीशी लढताना तंत्रज्ञानाची मदत महत्वपूर्ण ठरली. सॉफ्टवेअर हे एक असे क्षेत्र आहे की जेथे संसाधनांची कमतरता नाही.
म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण शक्य झाल्याबरोबर भारताने आपले कोविड ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजेच संसर्गाचा माग काढणारे आणि संसर्ग शोधणारे तंत्रज्ञान ओपन सोर्स केला आहे. 200 दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे ऍप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध असल्याचे सांगितले.
लसीकरणाला महत्व देत भारताने नियोजनात पुर्णपणे डिजिटल दृष्टीकोन स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण झाल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टीने लोकांची सोय झाली व त्यामुळे कोविडोत्तर ग्लोबल जगात सहजता येईल. हा सुरक्षित, रक्षण करणारा आणि विश्वासपात्र पुरावा वापरून लोकांना आपले लसीकरण केन्हा कसे आणि कोणाकडून झाले हे खात्रीशीरपणे सांगता येईल. लसींच्या वापराचा माग आणि कमीत कमी नुकसान यासाठी डिजिटल दृष्टीकोन मदत करतो असेही ते म्हणाले.
भारताने अन्य देशांसाठी कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसेच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.
कोविनमार्फत काही दिवसांपूर्वीच एका दिवसात 9 दशलक्ष लोकांना व याप्रकारे आतापर्यंत 350 दशलक्ष लसीकरण मात्रा दिल्या गेल्याचे सांगितले. याशिवाय लसीकरणाचा पुरावा म्हणून कोणताही नाशिवंत कागद जवळ बाळगण्याची गरज नाही तर तो डिजिटल प्रकारे तयार होतो असे सांगितले. कोविनसाठी इच्छुक असणाऱ्या देशांना आवश्यक असणारे बदल कोविनमध्ये करता येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.