पुणे- पुण्यामध्ये अनेक पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला त्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. केवळ हिंदूच नव्हे तर त्यामध्ये जैन मंदिरांचाही समावेश आहे. “जागतिक वारसा दिना’निमित्त (दि. 18 एप्रिल) शहरातील या दोन जैन मंदिरांची ओळख महत्त्वपूर्ण ठरते.
शहरात गुरुवार पेठेतच श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. त्याआधी एक जैन मंदिर आहे त्याला “संघ मंदिर’ नावाने संबोधतात.
श्री श्वेतांबर जैन संघ हे शहरातील सर्वांत जुने आणि पुण्यातील जैनांचे प्रथम मंदिर आहे. या मंदिरात दोन भाग आहेत, एक म्हणजे मुलनायक श्री आदिनाथ भगवानचे मंदिर तर दुसऱ्या बाजूला श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवानचे प्रथम मंदिर.
हे मंदिर सुमारे 238 वर्षे जुने आहे. पेशव्यांच्या काळात ही मंदिरे नावारूपाला आली. 1750 च्या आसपास गुजरात आणि मारवाडमधील सावकार पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी आपल्या धार्मिक श्रद्धा जोपासण्यासाठी शंकराचार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मंदिर बांधण्याची परवानगी मिळवली. पेशव्यांनी शंकराचार्यांच्या या अटी लक्षात घेऊन वेताळाच्या मंदिराजवळ गावाबाहेर उपाश्रयासाठी जागा दिली. पाच मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना भुयारामध्ये, साध्या रचनेच्या मंदिरात करण्यात आली. अंदाजे इ. स. 1750 मध्ये हे मंदिर बांधले गेले. मंदिरात पार्श्वनाथ तीर्थकरांची मूर्ती प्रमुख होती. इ.स. 1820 च्या आसपाससुद्धा वेताळ पेठेतील (सध्याचे गुरूवारपेठ) लोकसंख्याही कमी होती. त्यावेळी या भागात जैनधर्मीय स्थिरस्थावर झाले.
पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांकडून परवानगी घेऊन जैनधर्मीयांनी या भागात अनेक मंदिरे बांधली. इ. स. 1830 ते 1834 मध्ये आदीश्वर या प्रथम तीर्थकराचे संगमरवरी मंदिर बांधले. मोठे लाकडी प्रवेशद्वार उभे करून कमानीवर चौघडा वाजवणाऱ्यांना बसण्याची सोय केली होती. सन 1940 सालापर्यंत तेथे नियमित चौघडा वाजवला जात असे. त्यानंतर पुढील 50 वर्षांत तेथे चार जैन मंदिरे उभी राहिली. पोरवाल, ओसवाल, वगैरे मंडळींनी वेगळी मंदिरे बांधली. ही सर्व मंदिरे जैन लोकांकडून वर्गणी गोळा करून बांधण्यात आली. सन 1937 सालापर्यंत या जैन मंदिराच्या सभोवताली पुण्यातील एकूण जैन लोकसंख्येच्या 63.7 टक्के समाज राहात होता. आज पुण्यात सुमारे 50 हून अधिक जैन मंदिरे आहेत.
श्री जैन दादावाडी श्वेतांबर टेम्पल ट्रस्ट मंदिर, सारसबाग
सुमारे 250 वर्षे पुण्यातील सारस बागजवळील श्री जैन दादावाडी श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्ट मंदिर आहे. येथे मुलनायक नाकोडा पार्श्वनाथ भगवान आहे तर एका बाजूला आदिनाथ भगवान आहेत आणि दुसऱ्या बाजूला महावीर भगवान विराजमान आहेत. दादावाडी मंदिरात गुजरातमधील शत्रुंजय गिरीराज मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे. या प्रतिकृतीचे दर्शन घेतले की जैन बांधव हे “शत्रुंजय गिरीराज’चे दर्शन झाले असे समजतात.