इंदापूर (प्रतिनिधी) –निमगाव केतकी गावच्या हद्दीत इंदापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी आज (शुक्रवारी) केलेल्या संयुक्त कारवाईत 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा पदार्थासह टाटा कंपनीची हॅरिहर कार, ह्युंदाई कंपनीची आय 20 कार व अल्टो कार ताब्यात घेतली आहे. तर पाचजणांवर कारवाई करण्यात आली.
अमिर गुलाब मुलाणी (रा. मळद, ता. बारामती), प्रकाश राजेंद्र हळदे (वय 37, रा. बारामती; मूळ रा. मुखई एसटी स्टॅंडजवळ, ता. शिरूर), खंडू अश्रू परखड (वय 29, रा. पाव्हणेवाडी, ता. बारामती; मूळ रा. लोणीपारवडवस्ती ता. जामखेड), रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप (वय 33, रा. देसाई इस्टेट, बारामती), सूरज भगवान कोकरे (वय 32, रा. हनुमंतवाडी पणदरे) यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी इंदापूर-सरडेवाडी टोल नाक्यावर सापळा लावला असता, एक आय 20 कार व त्याच्या पाठीमागे एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची हॅरीहर कार जात असताना पोलीसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. हॅरीहर कार न थांबता पुणे बाजुकडे गेल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला, ती कार निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरीजवळ ताब्यात घेऊन चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली. गाडीच्या डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली गांजाची पाकिटे आढळली. या कारला बेकायदेशीर रित्या वाहतूक करण्यासाठी आय 20 कार (एमएच 05 सीएम 8500) व अल्टो कार (एमएच 18 व्ही 465) ही मागे पुढे पायलेटींग करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेतल्या.
विशाखापट्टणममधून विक्रीसाठी आणला
हा गांजा त्यांनी विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. ही 110 पाकिटे उघडून पाहिले. त्यामध्ये एकूण 54 लाख 55 हजार रुपयांचा, कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असा 218 किलो 200 ग्रॅम वजानाचा गांजा व तीन कारसह असा एकूण 80 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक निरीक्षक प्रकाश पवार, ज्ञानेश्वर धनवे, माने, उपनिरीक्षक दाजी देठे, सुधीर पाडुळे व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, काशीनाथ राजापुरे, हवालदार ए. डी. एकशिंगे, एस. एम. आहिवळे, शेळके, मोमीन, एम. एन. थिगळे, सतीश ढवळे, युवराज कदम, बी. एम. मोहिते, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. यु. काळे, व्ही. एस. राखुंडे, विशाल चौधर यांच्या पथकाने केली.