काटीत अळ्यामिश्रीत पाणीपुरवठ्याबाबत प्रशासन अलर्ट
रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेतून आळीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याची दखल इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयराव परीट यांनी तात्काळ घेतली. त्यांनी थेट काटीगाव गाठले. अशुद्ध पिण्याच्या टाकीवर दोन मजले गटविकास अधिकारी चढले. संबंधित कर्मचाऱ्यांना ही पाण्याची टाकी स्वतः उभे राहून स्वच्छ करून घेत पुन्हा अशा चुका झाल्या तर माफी करणार नाही, अशी तंबी देली. यावेळी नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. त्यामुळे आरोचे शुद्ध पाणी मोफत गावकऱ्यांना सोमवारपासून कायमस्वरूपी सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीअंतर्गत येथील दलित वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टाकी शुद्ध केली नाही. त्यामुळे टाकीत अळ्या तयार झाल्या होत्या. हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी जात होते. ही टाकी उभारताना संबंधित ठेकेदाराने जिन्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे टाकीवर कर्मचाऱ्यांना चढता येत नव्हते. पाणी शुद्ध करण्यासाठी यामध्ये पावडर टाकता येत नव्हती. हे कारण विजयराव परीट यांना समजले. त्यामुळे परीट यांनी संबंधित ठेकेदाराने पूर्ण कामाचे बिल काढले आहे. त्यांनी तात्काळ राहिलेले काम पूर्ण करून द्यावे, असे ग्रामपंचायतीला कळवले आहे. ग्रामस्थांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने व पंचायत समितीने शिफारस करावी, असा हेका धरला आहे. यावेळी विस्तार अधिकारी काय करीत होते, असा सवाल परीट यांनी केला.
ग्रामसेवक जी. एस. खरमाटे म्हणाले की, संबंधित गावकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने शुद्ध पाणी कायमस्वरूपी पुरवले जाईल. शुद्ध पाणी एटीएमवर ग्रामपंचायत देत होते. मात्र इथून पुढच्या कालावधीत हे शुद्ध पाणी सर्व गावकऱ्यांना विनामूल्य दिले जाईल. त्यामुळे गावकऱ्यांनी शुद्ध पाणी घेऊन जावे