वॉशिंग्टन – करोना महामारीच्या काळामध्ये अनेकांना विशेषतः लहान मुलांना डोळ्यांच्या समस्या भेडसावत असून डोळे लाल होणे किंवा कोरडे होणे या प्रकारचे विकार समोर येत असल्याने चिंता वाढली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये डोळे दुखणे, डोळे चुरचुरणे किंवा डोळे लाल होणे या प्रकारच्या समस्या वाढल्या आहेत. प्रख्यात नेत्र तज्ञ डॉक्टर सॅम बर्न यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कालावधीमध्ये लॉकडाउनच्या कारणामुळे अनेक लोक सतत टीव्हीसमोर किंवा कॉम्प्युटरसमोर किंवा मोबाइलसमोर असल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.
विशेषतः मोबाइलचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. अमेरिकेतील आरोग्य संस्था असलेल्या सीडीसी या संस्थेच्या मते मोबाइल स्क्रीन पाहिला जात असताना पापण्या झाकण्याचे प्रमाण तब्बल 66 टक्क्यांनी कमी होते. त्याचा फटका डोळ्यांना बसतो. अमेरिकेतील बहुतेक लहान मुले दिवसातील चार पेक्षा जास्त तास मोबाइलवर व्यतीत करत असल्यामुळे त्यांना या डोळ्यांच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
या समस्येपासून वाचवण्यासाठी तज्ञांनी काही सोपे उपाय सुचवले आहेत. त्यामध्ये ट्वेंटी-ट्वेंटी फॉर्म्यूला हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्याप्रमाणे वीस मिनिटे मोबाइलचा स्क्रिन पाहिल्यानंतर वीस सेकंद 20 फूट अंतरावरील एखाद्या वस्तूकडे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे डोळ्यांना आराम पडतो. मुलांनी कॉम्प्युटरचा आणि मोबाइलचा स्क्रीन आपल्या डोळ्यापासून किमान वीस इंच अंतरावर ठेवावा, असेही सुचविण्यात आले आहे.
मुलाची दृष्टी कमजोर असेल तर कॉम्प्युटर किंवा मोबाइल वापरत असताना त्याने चष्मा वापरावा असेही तज्ञांनी सुचवले आहे. मोबाइल किंवा कॉम्प्युटवर जर वाचन केले जात असेल तर आपण जे काही वाचत आहोत त्याचा फॉन्ट साईज मोठा करावा अशा सूचनाही या तज्ञांनी केल्या आहेत.