सातारा -साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
जिल्ह्यातील करोनाची स्थिती, आरोग्य व्यवस्था व उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
जिल्ह्यात करोनाचा प्रार्दुभाव प्रचंड प्रमाणात झाल्याने ऑक्सिजन बेडस्ची कमतरता भासत आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात ऑक्सिजन बेडस्ची सोय असल्याने तेथे मोठा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तालुक्यातील रुग्णालये आणि ग्रामीण प्राथमिक रुग्णालयांची क्षमता वाढवावी, अशी सूचना रामराजे यांनी केली. जिल्ह्यात अधिक ऑक्सिजन बेडस्ची सुविधा उपलब्ध करण्याबरोबर खाजगी कंपन्या आणि इतर आस्थापनांकडे असलेले ऑक्सिजन सिलिंडर प्रशासनाने ताबडतोब ताब्यात घ्यावेत, असा आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील कोविड रुग्णालयाचे काम अधिक गतीने करून हे रुग्णालय जिल्हावासीयांच्या सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात आणखी साडेसहाशे ते सातशे बेडस् निर्माण करण्यात येतील. त्यावर कामही सुरू आहे.
शक्य असेल तिथे बेडस् वाढवून ते रग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे शेखर सिंह यांनी सांगितले. तालुका स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रातही अधिक सुविधा निर्माण करण्यात येत असून काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर आहे. क्षमता वृद्धीबरोबर तिथे आरोग्य सुविधा देण्याबाबतही कार्यवाही केली जाईल, असेह ते म्हणाले.