पुणे – महापालिका शाळांमधील हंगामी शिक्षकांना पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र, दरमहा दहा हजार रुपये वेतनावर आता अध्यापन करणे शक्य नाही. वेतनाची रक्कम 15 हजार रुपये करा, अन्यथा मुदतवाढ न देता सेवेतून कार्यमुक्त करा, अशी मागणी हंगामी शिक्षकांतून होत आहे.
शिक्षण मंडळाने 130 शिक्षकांना सहा महिन्यांच्या करारानुसार नियुक्ती केली. त्यांना वेतन दहा हजार रुपये असल्याने काही शिक्षकांनी रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील जवळपास 80 शिक्षकांनी सेवेत रुजू झाले आहे. या हंगामी शिक्षकांची करार 16 जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. तुटपुंज्या वेतनावर आता काम करणे कठीण आहे. इतक्या वेतनावर उदरनिर्वाह भागविणे शक्य नाही. तसेच, मात्र पालिका शिक्षण मंडळाकडून वेतनवाढीसाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला सेवेतून कार्यमुक्त करा आणि आमची अनामत रक्कम त्वरित परत मिळावी, असे पत्र काही शिक्षकांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिले आहे.
दरम्यान, हंगामी शिक्षकांचा करार येत्या आठवभरात पूर्ण होत आहे. त्यानंतर शैक्षणिक सत्र पूर्ण होण्यासाठी केवळ तीन महिनेच आहेत. त्यामुळे पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून हंगामी शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे शक्य नाही. त्यामुळे या शिक्षकांना एक दिवस सेवा खंडित करून आणखी तीने ते सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
शिक्षण मंडळाच्या निर्णयाकडे लक्ष
हंगामी शिक्षकांची एवढ्या वेतनावर अध्यापन करण्याची मानसिकता नाही. सर्व पात्रता असूनही पालिका शिक्षण मंडळाकडून काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता हंगामी शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत वेतनात वाढ केल्याशिवाय सेवेत रुजू होणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. परिणामी, आता शिक्षण मंडळाकडून काय निर्णय घेण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.