Lonar Lake| जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरोमधील जलपातळीत सातत्याने वाढ होत आहे. जाणकरांनी वाढत्या जलपातळीत बाबत चिंता वर्तवली आहे. काही वर्षांपूर्वी सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. तसेच आता सरोवराच्या जलपातळीत वाढ होत असल्याने दर्शनासाठी सहज जाता येत असलेली दर्शनस्थळे पाण्याने व्यापलेली दिसत आहे.
लोणार सरोवरामध्ये सातत्याने काहींना काही बदल होतांना दिसतात. यामुळे कुतुहालापोटी पर्यटक, भाविक तसेच अभ्यासू नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच सरोवरातील जल पातळीत वाढ होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र जलपातळीत नेमकी कशामुळे वाढ झाली आहे हे गूढ अजून उलगडलेले नाही.
सरोवराच्या जलपातळीत वाढ का होत आहे? ( Lonar Lake )
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर हे धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक बदलावर सर्व स्तरावर खूप बारकाईने लक्ष ठेवून नोंदी घेतल्या जातात. त्याचाच हा भाग म्हणून सरोवराच्या जलपातळीत सतत वाढ होत असल्याने साहजिकच कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय झाला आहे.
सरोवराच्या जलपातळीत वाढ का होत आहे? या बद्दल ठोस कारण अजून समोर आलेले नाही. सरोवराच्या जलपातळीत वाढ होत राहिल्यास पाण्याच्या मूळ गुणधर्मामध्ये काही फरक पडेल का? फरक पडल्यास त्याचा सरोवराच्या नैसर्गिक साधन संपत्तीवरही काही फरक पडेल का? सरोवर परिसरात राहणाऱ्या प्राणी व पक्षांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असे अनेक प्रश्न कमळजा माता मंदिरापर्यंत पाणीपातळी वाढल्याने उपस्थित होत आहेत.
दररोज एवढे पाणी सरोवरात
लोणार सरोवराच्या कमळजा माता मंदिरापासून मे २०२० मध्ये अंदाजे सुमारे ३८ मीटर आत पर्यंत पाणी आटले होते. त्यामुळे सासू- सुनेची विहीर उघडी पडली होती. मात्र, आता सासू-सुनेची विहीर पाण्याने वेढली गेली आहे. लोणार धारतीर्थ पापहारेश्वर तसेच सीतान्हाणी या तिन्ही ठिकाणावरून प्रति तास अंदाजे ४३,८५० लिटर तर प्रत्येक दिवसाला अंदाजे १०,५२,४०० लिटर पाणी हे सरोवराच्या परिसरात जाते.