लोणार सरोवर होणार “रामसर’ स्थळ

पुणे – बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला “रामसर’ दर्जा मिळावा, यासाठी राज्य जैवविविधता मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील महत्त्वाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या लोणार सरोवरास हा दर्जा मिळाल्यास परिसरातील जैवविविधता संरक्षणासाठी ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्‍वास मंडळाकडून व्यक्‍त केला जात आहे.

एखाद्या पाणथळ क्षेत्राला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी ते क्षेत्र “रामसर साइट’ म्हणून घोषित होणे महत्त्वाचे असते. यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी महत्त्वाची मदत मिळते. नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्‍वर अभयारण्याला नुकताच रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. 

त्याच साखळीत आता लोणार सरोवराचा समावेश करण्यासाठी राज्य जैवविविधता मंडळाकडून प्रयत्न सुरू असून, यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. 

लोणार सरोवरातील पाण्यात निळे-हिरवे शेवाळ असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.

देशात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक पाणथळ क्षेत्रांना रामसर दर्जा मिळाला आहे. तर महाराष्ट्रात केवळ एकच रामसर क्षेत्र आहे. त्यादृष्टीने लोणारसाठी होणारे हे प्रयत्न जैवविविधता संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 

सरोवराला धोका…
आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी आणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे तिथली दुर्मीळ जैवविविधता धोक्‍यात आली आहे. अलीकडे सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेही सरोवराला धोका निर्माण झाला आहे. नुकतेच सरोवरातील पाणी अचानकपणे गुलाबी झाल्याने अनेकांना त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते.

लोणार सरोवराविषयी…
लोणार हे बेसॉल्ट खडकावर उल्का पडल्याने तयार झालेले एकमेव सरोवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. हे सरोवर 137 मीटर खोल आणि 1.8 किलोमीटर रुंद आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. एक अतिवेगवान उल्का आदळल्याने ते निर्माण झाले असून, सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे 52 हजार वर्षे आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय 5 लाख 47 हजार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.