Inauspicious Number : ख्रिश्चन संस्कृतीतील विश्वासाप्रमाणे 666 हा क्रमांक अपशकुनी मानला जातो. हा आकडा सैतानाशी संबंधित आहे असा विश्वासही या संस्कृतीत बाळगला जातो. साहजिकच पाश्चिमात्य देशांमध्ये कोठेही 666 हा आकडा सार्वजनिक ठिकाणी वापरला जात नाही. पण पोलंडमधील एका पर्यटन स्थळाला घेऊन जाणाऱ्या एका बसचा क्रमांक 666 हा होता. हा क्रमांक बदलला जावा अशी मागणी दीर्घकाळ त्या भागातील पर्यटक आणि नागरिक करत होते.
अखेर या मागणीला यश आले असून संबंधित कंपनीने या बसचा 666 हा क्रमांक बदलून तो 669 असा केला आहे. दहा वर्षापासून हा क्रमांक बदलला जावा यासाठी प्रयत्न सुरू होते. विविध प्रवासी संघटना आणि पर्यटनाशी निगडित संस्थांनी याबाबत पोलंड सरकारला निवेदन दिले होते. हा क्रमांक बदलू नये अशा प्रकारची मागणी करणाऱ्या लोकांचाही गट मोठा होता म्हणूनच निर्णय होत नव्हता.
पोलंडमधील हेल हा समुद्रकिनारा केवळ पोलंडमधीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणीच घेऊन जाणारी ही बस होती. या बसमध्ये बसत असताना या बसचा क्रमांक 666 असल्याने विनाकारणच अनेक पर्यटकांच्या मनात शंकेची भावना निर्माण होत असे, म्हणूनच हा क्रमांक बदलला जावा या मागणीने जोर धरला होता.
दहा वर्ष त्यासाठी प्रयत्न सुरू होते, अखेर ही बस चालवणाऱ्या कंपनीने तो नंबर बदलण्याचा निर्णय घेतला. या बस कंपनीने दीर्घ काळ हा नंबर चालू ठेवल्यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. अशी भूमिकाही नंतरच्या कालावधीमध्ये काही संघटनांनी घेतली होती, त्यामुळे हा विषय अधिक पेटण्यापूर्वीच बस कंपनीने बसचा नंबर बदलण्याचा निर्णय घेतला.