नगर -राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 121 व्या जन्मजयंतीनिमित्त नगरमधील श्री तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डच्या ुुु.क्षवलि.ले.ळप या वेबसाईटचे उद्घाटन झाले आहे.
परीक्षा बोर्ड या नावाने प्रसिध्द असलेली ही संस्था 85 वर्षांपासून निरंतर कार्यरत असून, जैन तपस्वी, साधूसाध्वीजींच्या तसेच श्रावक श्राविकांच्या धार्मिक परीक्षांचे नियोजन व संचलन या संस्थेतून होत असते. धार्मिक परीक्षांचे नियोजन करणारी ही सर्वात पहिली व एकमेव संस्था असून वेबसाईटच्या माध्यमातून आता संस्थेच्या कार्याची, परीक्षांची विस्तृत माहिती सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
आचार्य पूज्य आनंदऋषीजी महाराज यांनी संपूर्ण भारतभर विहार करताना प्रत्येक गावी, शहरात रचनात्मक कार्याचे बिजारोपण केले. शाळा, कॉलेज, छात्रालय, धर्मस्थानक, पाठशाळा आदी अनेक रुपात त्यांनी हे कार्य केले. यात श्री तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड अतिशय महत्त्वाचे आहे.
85 वर्षांची परंपरा असलेली या संस्थेचे शारदीय वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. संस्थेचे कार्य व माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी डॉ.तृप्ती जैन, सिमरन मुनोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेबसाईट बनविण्याचे काम केले.