नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रमाणित यांनी रविवारी फिट इंडिया मोबाइल ॲपचे उद्घाटन केले. या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांनी चक्क दोरीवरच्या उड्या मारत आपलेही कसब व तंदुरुस्ती सिद्ध केली.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
ठाकूर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन संस्मरणीय करण्यासाठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग, कुस्तीपटू संग्राम सिंग, क्रीडा पत्रकार अयाज मेमन आणि एअर इंडियाची कर्णधार एनी दिव्या यांनाही व्हर्चुअल माध्यमातून या कार्यक्रमात निमंत्रित केले होते.
ठाकूर यांनी या सोहळ्यात एका पायावर दोरीवरच्या उड्या मारत आपले कसब सिद्ध केले. फिट इंडिया मोहीम दोन वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली होती.
2019 सालीच पंतप्रधानांनी फिट इंडिया मोहिमेची संकल्पना मांडून त्याची रचना तयार करण्याच्या कामाची सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम फिट इंडिया स्कूल वीक, फिट इंडिया फ्रीडम रन, फिट इंडिया सायक्लेथॉन यांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. आता या ऍपद्वारे करोडो देशवासियांपर्यंत ही मोहीम पोहोचेल.