आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विद्यार्थी हा शाळेचा आत्मा म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कलागुणांना वाव / व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने भौतिक सुविधांच्या माध्यमातून एक भव्य – दिव्य असे ‘कै. दत्तात्रय मारुती आढाव कलादालना’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
ह.भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव, उद्योगपती रमेश दत्तात्रय आढाव, प्रसिद्ध चित्रकार बापूसाहेब झांजे, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ उपाध्यक्ष किरण सरोदे, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ अध्यक्ष मिलिंद शेलार, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, सुनील घुंडरे, नारायण गावडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांचे ढोल पथक, लेझीम, वारकरी विद्यार्थ्यांनी टाळमृदंगाच्या सुमधूर संगीताने तसेच विद्यालयातील दिव्यांग विभागातील अंध विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने स्वागत केले. अजित वडगावकर यांनी सर्वांना प्रशालेची इमारत दाखवली.
कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने तसेच प्रशालेची विद्यार्थिनी राजलक्ष्मी लिखे हिच्या सुमधुर आवाजातील ईशस्तवनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत संस्थेच्या सर्व घटकाच्या सहकार्य यामुळेच प्रशालेचा हा विकास करू शकलो, असे सांगितले व कलादालन उभारणीसाठी आढाव कुटुंबियांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने आभार व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थी ज्ञानेश्वर गायवाल याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता व कलागुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना देत असलेल्या भौतिक सुविधा याबद्दल संस्था व प्रशालेचे कौतुक केले. तसेच विश्वस्त प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत संतांचे चरित्र व त्यांचे विचार पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून संत साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ओळख ज्ञानेश्र्वरीची उपक्रम राबविण्याविषयी तसेच त्याचा विस्तार व उपयोगिता याविषयी आपले मत विषद केले. रमेश आढाव यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत कलादालनाला त्यांच्या स्वर्गीय पित्याचे नाव दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक विशाल सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील ईश्वरी क्षमता व शक्ती ओळखून त्यांचा विकास करून जगाचे कल्याण साधण्यासाठी प्रेरित केले. तसेच आजच्या काळात सुसंस्कृत चरित्र निर्माण करणे खूप गरजेचे आहे असे सांगत 6 दशकाहूनही अधिक काळापासून ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या झालेल्या विकासाचे, एवढी मोठी विद्यार्थी संख्या व त्यांना या संस्थेमार्फत देत असलेल्या संस्कारक्षम शिक्षणाचे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तसेच संस्थेच्या सर्व घटकांचे कौतुक करत मनस्वी झालेला आनंद व्यक्त केला.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नारायण महाराज जाधव यांनी आयुक्तांना त्यांच्या मनोइच्छा पूर्णत्वासाठी व सर्वांच्या सुखासाठी माऊली कडे प्रार्थना करत श्री ज्ञानेश्वर विद्यालय हे विश्वविद्यालय होवो अशी कामना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने कलादालन यासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या रमेश आढाव, सुनील घुंडरे व नारायण गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नारायण गावडे यांनी विद्यालयातील हुशार व गरजू अशा 11 विद्यार्थ्यांना मदत म्हणून सायकल देण्याचे जाहीर केले.
कलादालन साकारण्यासाठी कलाशिक्षक दत्तात्रय वंजारी, सोमनाथ बेळळे यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना सहकार्य करणाऱ्या वास्तू विशारद धीरज मोहिते यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सर्व प्रशाला रांगोळीने सजवण्यात आली होती.
विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर गुगल मीट, फेसबुक लिंक, तसेच युट्युब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. स्वच्छता, शिस्त, क्रीडा समिती व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर घुंडरे व अनुजायिनी राजहंस यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यालयातील गणेश लिखे यांच्या सुमधुर आवाजातील माऊलींच्या पसायदानाने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले यांनी सहकार्य केले.