उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

फक्त चार जणांना वाचवता आले डिपॉझिट 

प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर पराभव

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मोदी “त्सुनामी’ने विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. उत्तर प्रदेशात 80 पैकी कॉंग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली, तर फक्त चार उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आले आहे. कॉंग्रेसने 67 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

अखिलेशला नोटापेक्षाही कमी मते
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, जितीन प्रसाद यांच्यासह निर्मल खत्री, नसीमुद्दीन सिद्दीकी आणि अजय राय यांच्यासारख्या दिग्गजांना डिपॉझिट वाचवता आले नाही. विशेष म्हणजे 10 जागांवर कॉंग्रेस उमेदवारांना एकूण मतांच्या दोन टक्‍क्‍यांपेक्षाही कमी मते मिळाली. तर भदोहीमधून कॉंग्रेसचे उमेदवार अखिलेश यांना “नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

कॉंग्रेसच्या महासचिवपदी निवड करत प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. प्रियांका गांधींमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी दिसत असल्याचे सांगत कॉंग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचाही दावा करण्यात आला. पण प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. कॉंग्रेसची एवढी वाईट परिस्थिती आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत 1977 ला झाली होती. त्यावेळी कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात खातेही उघडता आले नव्हते.

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसच्या चार जणांना डिपॉझिट वाचवण्याएवढी मते मिळाली. यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, इम्रान मसूद आणि श्रीप्रकाश जयस्वाल यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सोनिया गांधींच्या रुपाने कॉंग्रेसने फक्त एकच जागा जिंकली आहे. रायबरेलीतून सोनिया गांधींनी 5,34,918 मते घेतली, जी एकूण मतांच्या 55.80 टक्के आहेत. तर राहुल गांधींना अमेठीत 4,13,394 (43.86%) मते मिळाली. कानपूरमध्ये श्रीप्रकाश जयस्वाल यांनी 3,13,003 (37.13%), सहारनपूरमधून इम्रान मसूद यांनी 2,07,068 (16.81%) मते मिळवली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.