वेळला पूर आला अन्‌ ऊस वाहून गेला

शिरूर तालुक्‍यातील जातेगाव बुद्रुक येथील घटना

शिक्रापूर (पुणे) – शिरूर तालुक्‍यातील वेळ नदीला महापूर आल्यामुळे जातेगाव बुद्रूक येथील शेतकऱ्याचा ऊस वाहून गेला आहे, त्यामुळे शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी करत आहे.

मागील काही दिवसांत तळेगाव ढमढेरे येथील स्मशानभूमीचा काही भाग वाहून गेला होता. येथील काही शेतकऱ्यांची शेती वेळ नदीच्या कडेला आहे. सध्या वेळ नदीला पूर आल्यामुळे नदीचे पाणी शेतात घुसले आहे. यामध्ये शिवाजी खळदकर, दत्तात्रय खळदकर, बाळासाहेब खळदकर आणि विलास खळदकर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शिवाजी खळदकर यांच्या शेतातील दोन एकर ऊस शेतातील मातीसह वाहून गेला आहे. त्यामुळे शिवाजी खळदकर यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन करोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून गेल्याने या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तर सदर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

जातेगाव बुद्रूक येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीची नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. येथील ठिकाणच्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. हा पंचनामा वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
– किरण जाधव, तलाठी.

Leave A Reply

Your email address will not be published.