उत्पन्न शून्य, खर्च हजारोंमध्ये

असंख्य शिक्षकांवर उपासमारीची वेळ


कोचिंग क्‍लासेस असोसिएशनची क्‍लास सुरू करण्याची मागणी

पिंपळे निलख – करोनाचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने मार्च अखेरपासून शाळा व खासगी शिकवणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणी घेणाऱ्या असंख्य कॉन्ट्रॅक्‍ट मानधनावर काम करणाऱ्या असंख्य शिक्षकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.

क्‍लासचालकांना सध्या मागील सहा महिन्यांपासून उत्पन्न शून्य तर खर्च हजारो रुपयांमध्ये करावा लागत असल्याने आर्थिक परिस्थिती हलाकीची बनली आहे. तेव्हा शासनाने त्वरित कोचिंग क्‍लास सुरू करावेत, अशी मागणी कोचिंग क्‍लासेस असोसिएशन महाराष्ट्रचे पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने त्वरित निर्णय घेऊन खासगी कोचिंग क्‍लास सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. खासगी कोचिंग क्‍लास शिक्षकांच्या चरितार्थ चालविण्यासाठी खासगी ठिकाणी जागा भाड्याने घेऊन व त्यासंदर्भात विविध जाहिरात तसेच इतर शिक्षक नेमून क्‍लास चालविण्यात येतो. त्यासाठी खूप मोठी गुंतवणूक व इतर खर्च करावा लागत असतो. गेले सहा महिने झाले गाळे व इतर जागांचे भाडे क्‍लासचालकांना खिशातून भरावे लागत आहे. हा खर्च महिन्याला पंधरा हजार ते पन्नास हजार रुपये व त्याहूनही जास्त असून, गेले सहा महिने झाले हा खर्च अनेक लाख रुपयांमध्ये जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे खासगी शिकवणी चालक मोठ्या आर्थिक अडचणीत आले असून, शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत अथवा क्‍लास चालू करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 

या व्यवसायाला सरकारकडून कुठलेही अनुदान, सोयी सवलती दिल्या जात नाहीत. विद्यार्थी, पालकांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या फी मधूनच आम्हाला क्‍लासचे भाडे, शिक्षकांचे पगार, शैक्षणिक साहित्य, जाहिराती, शासनाचे विविध कर भरावे लागत असल्याचे व एवढा खर्च वजा करून शिल्लक राहिलेल्या रकमेतून आम्हाला स्वतःचे खर्च, यामध्ये घरांचे हप्ते, भाडे, बॅंकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, रेशनपाणी, आईवडिलांचे औषधपाणी इ. खर्च भागवावे लागत असल्याचे खासगी शिकवणी चालकांचे म्हणणे आहे. तरी शासनाने व सर्व स्तरावर विचार केला जावा, अशी मागणी कोचिंग क्‍लासेस असोसिएशन महाराष्ट्रचे पिंपरी-चिंचवड विभाग अध्यक्ष प्रा. उमेश बोरसे, पांडुरंग फुंदे, सुषमा समर्थ, अशोक पाटील, महेश भुजबळ, अशोक धुळधुळे, सचिन सोनार, पांडुरंग वाघमारे, शरद शिंदे, हरिशचंद्र पाटील, आनंद सोनटक्के, पद्‌माकर मोरे, सुभाष हंगे, गणेश सांगळे यांनी मागणी केली आहे.

कोचिंग क्‍लासच्या शासनाकडे विविध मागण्या…
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या अटीवर व सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे शिकवणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. क्‍लासेस क्षेत्राचा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करण्यात यावा. कोचिंग क्‍लासेस व्यावसायिकांना सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रतिमाह वीस हजार रुपये मानधन द्यावे. कोचिंग क्‍लासेस व्यावसायिकांना मुद्रा लोन द्यावे. कोचिंग क्‍लासचे एक वर्षाचे जी. एस. टी., व्यवसाय कर, आयकर कर, लाईट बिल व स्थानिक कर माफ करण्यात यावा. या व अशा विविध प्रकारच्या सवलती देऊन शिक्षण देणाऱ्या क्षेत्रास बळकटीकरण देण्यात यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.