मुंबई : भारतासह जगभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असतानाच, कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्या खालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर तर ब्राझिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. काळजीची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
खरंतर चौथ्या स्थानी रशिया होता. तिथे 10 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. मात्र आता रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आता 10 लाख 77 हजार 374 कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 7 लाख 55 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 91 हजार 256 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने 29 हजार 894 बळी घेतले आहेत.
देशभरात आतापर्यंत अबतक 80 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून बाधितांचा आकडा 50 लाखांच्या घरात पोहोचला आहे. देशात मागील 24 तासात 83 हजार 809 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 24 तास 1054 जणांचा मृत्यू झाला. देशात 2 सप्टेंबरपासून दररोजचा कोरोनाबळींचा आकडा एक हजारापेक्षा जास्त आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 79 हजार 292 रुग्ण बरे देखील झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 30 हजार झाली आहे. त्यापैकी 80 हजार 776 जणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव रुग्णांची संख्या 9 लाख 90 हजार झाली असून 38 लाख 59 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुमारे चार पट अधिक आहे.
दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू दर आणि अॅक्टिव रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मृत्यूदर घसरुन 1.63 टक्के झाला आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णा ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांचा दरही कमी होऊन 20 टक्क्यांवर आला आहे. यासोबतच रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनामुक्त होण्याचा दर 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. भारतात रिकव्हरी रेट साततत्याने वाढत आहे